5
‘जागतिक बेघर दिना’निमित्त सावली निवारा केंद्रात अनोखा उपक्रम; बेघर बांधव पहिल्यांदाच बजावणार मतदानाचा हक्क!
पिंपरी प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. १० ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: ‘जागतिक बेघर दिना’चे औचित्य साधून पिंपरी विधानसभा कार्यालयाने (२०६ अ.जा.) लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी एक अत्यंत कौतुकास्पद आणि अनोखा उपक्रम राबवला आहे. पिंपरी येथील ‘सावली बेघर निवारा केंद्रात’ राहणाऱ्या सुमारे ७५ बेघर व्यक्तींमध्ये व्यापक मतदार जनजागृती करण्यात आली. या वेळी आधार कार्ड असलेल्या अनेक बेघर बांधवांची जागेवरच मतदार म्हणून नोंदणी करून घेण्यात आली असून, आगामी निवडणुकीत हे बांधव आयुष्यात पहिल्यांदाच आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
भारत निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार सध्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम (SIR 2026) सुरू आहे. पिंपरी विधानसभा कार्यालयाचे नोडल अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी सावली निवारा केंद्रात उपस्थित बेघर बांधवांना मतदार नोंदणीचे महत्त्व समजावून सांगितले.
“समाजातील अनाथ, निराधार आणि बेघर व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचा मतदानाचा घटनात्मक अधिकार अबाधित राहणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले. या प्रसंगी रियल लाईफ रियल पीपल संचालित सावली निवारा केंद्राचे अध्यक्ष एम. ए. हुसेन, पिंपरी विधानसभा कार्यालयाचे पर्यवेक्षक दिनेश जगताप, आणि महालिंग मुळे उपस्थित होते.
पिंपरी (अ.जा.) विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी अर्चना यादव यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व नागरिकांना मतदार यादीत आपले नाव तपासण्याचे आवाहन केले आहे. निवडणूक आयोगाने नवीन मतदार नोंदणी, दुरुस्ती व हरकती दाखल करण्यासाठी १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
१८ वर्षे पूर्ण झालेल्या नवयुवकांनी आणि ज्यांचे नाव मतदार यादीत नाही अशा पात्र नागरिकांनी फॉर्म ६ (Form 6) भरून ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष अर्ज सादर करावा. नाव, पत्ता किंवा अन्य तपशीलात त्रुटी असल्यास १२ ऑक्टोबरपूर्वी आवश्यक दुरुस्ती करून घ्यावी.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत ‘रियल लाईफ रियल पीपल’ संस्थेमार्फत संचलित सावली बेघर निवारा केंद्र गेल्या ६ वर्षांपासून अनाथ, बेघर आणि असाह्य लोकांसाठी कार्यरत आहे.
अध्यक्ष एम. ए. हुसेन, गौतम थोरात, अग्नेस फ्रान्सिस, शाहनवाज हुसैन, आणि सचिन बोधनकर यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत ९०० हून अधिक निराधार व्यक्तींची सेवा करण्यात आली आहे. सध्या केंद्रात ७५ लाभार्थी राहत असून त्यांना मोफत अन्न, निवारा, कपडे आणि वैद्यकीय उपचार दिले जातात. उत्कृष्ट कामगिरीबद्दल सावली निवारा केंद्राला महाराष्ट्र शासनाचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार’ मिळाला असून, निवारा केंद्र व्यवस्थापनात या केंद्राने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
