61
बुद्धिबळ महासत्ता रशियात चिंचवडच्या अन्वी हिंगेची सुवर्णभरारी; आशियाई शालेय स्पर्धेत पटकावले सुवर्ण आणि रौप्यपदक!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. १२ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: बुद्धिबळाची महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रशियाच्या भूमीत भारताच्या युवा बुद्धिबळपटूने आपल्या चमकदार खेळाने नवा इतिहास रचला आहे. चिंचवड येथील एलप्रो इंटरनॅशनल स्कूलमध्ये चौथीेत शिकणारी आणि वुमन कॅन्डिडेट मास्टर (WCM) किताबधारक अन्वी दिपक हिंगे हिने रशियातील तुला येथे पार पडलेल्या विसाव्या आशियाई शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत दिमाखदार कामगिरी केली आहे.
मुलींच्या नऊ वर्षांखालील गटात अन्वीने जलदगती ब्लिट्झ प्रकारात सुवर्णपदक, तर स्टँडर्ड प्रकारात रौप्यपदक पटकावत भारताच्या शिरपेचात मानाचे तुरे रोवले आहेत. या दुहेरी यशासह तिच्या आंतरराष्ट्रीय पदकांची संख्या आता पंधरावर पोहोचली आहे.
रशियातील तुला येथे १ ते ११ ऑक्टोबर २०२६ दरम्यान ही स्पर्धा झाली. यामध्ये ब्लिट्झ प्रकारात अन्वीने नऊ फेऱ्यांमध्ये आठ गुणांची उत्कृष्ट कमाई करत स्पर्धेत प्रथम स्थान मिळवले. तिच्या खात्यात आठ विजय आणि केवळ एका पराभवाची नोंद झाली. तुर्कमेनिस्तानच्या बागुल जुमायेवा हिला अर्ध्या गुणाने मागे टाकत तिने सुवर्णपदक आपल्या नावावर केले.
कझाकस्तानच्या अमालिया येद्रेसहेवा, रशियाच्या मिया कुद्र्याशोवा आणि लेयला इसायेवा या तगड्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत तिने आपली गुणवत्ता सिद्ध केली. पाचव्या फेरीत झालेल्या एका पराभवानंतर किंचितही न खचता तिने सलग चार सामने जिंकत विजयश्री खेचून आणली. या प्रकारात तिने १८३२ चे कामगिरी मानांकन नोंदवले.
ब्लिट्झमधील सुवर्णयशाबरोबरच अन्वीने स्टँडर्ड प्रकारातही अत्यंत संयमी आणि अभ्यासपूर्ण खेळाचे प्रदर्शन केले. मुलींच्या नऊ वर्षांखालील गटात तिने नऊ फेऱ्यांमध्ये साडेसहा गुण मिळवत रौप्यपदक पटकावले. संपूर्ण स्पर्धेत आपल्या मानांकनाला साजेसा खेळ करत तिने पदकाच्या शर्यतीत आपले वर्चस्व कायम ठेवले. एकाच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ब्लिट्झमध्ये सुवर्ण आणि स्टँडर्डमध्ये रौप्य अशी दोन पदके पटकावणे हे तिच्या अष्टपैलू खेळाचे मोठे द्योतक आहे.
अन्वीला तिचे प्रशिक्षक ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे, आंतरराष्ट्रीय मास्टर निखिल दीक्षित आणि मानसिक प्रशिक्षण मार्गदर्शक ऋतू बळ्यान चौधरी यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभत आहे. तांत्रिक तयारी, डावांचे विश्लेषण आणि मानसिक कणखरता या सर्व बाबींच्या जोरावर ती यशशिखरावर पोहोचत आहे.
तसेच, अन्वीच्या या प्रवासात मोरडे स्पोर्ट्स फाउंडेशन आणि लक्ष्य स्पोर्ट्स या संस्थांचे संस्थात्मक पाठबळ आणि प्रायोजकत्व अत्यंत मोलाचे ठरले आहे. तिच्या या यशाबद्दल कुटुंबियांनी, शाळेने आणि सर्व नागरिकांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, आगामी काळात ती भारतासाठी आणखी मोठी सुवर्णपदके जिंकावी, अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
