35
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी पिंपरीत मनसेची भव्य सह्यांची मोहीम; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. १३ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष आदरणीय राज ठाकरे यांच्या आदेशानुसार, केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना, पिंपरी-चिंचवड शहर’च्या वतीने भव्य सह्यांची मोहीम राबविण्यात आली.
केंद्रातील निवडणूक आयोगाच्या मनमानी व पक्षपाती कारभाराविरोधात मनसेने हा एल्गार पुकारला असून, ज्ञानेश कुमार यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी आक्रमक मागणी या वेळी करण्यात आली.
ही सह्यांची मोहीम मनसे शहराध्यक्ष, नगरसेवक तथा पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीचे संचालक सचिन तुकाराम चिखले यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात उभारण्यात आलेल्या विशेष व्यासपीठावर शेकडो नागरिक आणि मनसैनिकांनी सह्या करून निवडणूक आयोगाच्या कारभाराविषयी आपला तीव्र संताप व्यक्त केला.
या वेळी बोलताना शहराध्यक्ष सचिन चिखले म्हणाले, “निवडणूक आयोगाकडून लोकशाहीच्या चिंधड्या उडवण्याचे काम सुरू आहे. स्वायत्त संस्थांचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी आणि पारदर्शक निवडणुकांसाठी आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा आवश्यक आहे. राज साहेबांच्या आदेशानुसार हा लढा यापुढे अधिक तीव्र केला जाईल.”

या आंदोलनाला मनसेसोबतच इतर राजकीय व सामाजिक संघटनांनीही पाठिंबा दर्शवला. या प्रसंगी सचिन चिखले (शहराध्यक्ष व गटनेते, मनसे), चेतन पवार (शहर प्रमुख, शिवसेना), रुपेश पटेकर, राजू अवसरे, बाळा दानवले, रोमी सिंधू, अक्षय शिंदे, तुषार सोनटक्के, सागर बहुले, प्रमोद अडसुळे, संतोष यादव, दत्ता डांगे, प्रतीक कांबळे, वैभव फाळके, आकाश कांबळे यांच्यासह मनसे व शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सह्यांच्या मोहिमेला पिंपरी-चिंचवडमधील सर्वसामान्य नागरिकांनी, नोकरदारांनी आणि तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आंदोलनाच्या पुढील टप्प्यात मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना या सह्यांचे निवेदन पाठवण्यात येणार असल्याचे मनसेतर्फे स्पष्ट करण्यात आले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

