103
वैद्यकीय विभागातील संघटित व असंघटित कंत्राटी कामगारांना दिवाळी बोनस मिळालाच पाहिजे; कामगार नेते तथा माजी उपमहापौर केशव घोळवे यांचा आक्रमक पवित्रा!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. १३ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागांतर्गत कार्यरत असणाऱ्या संघटित आणि असंघटित कंत्राटी कामगारांना आगामी दिवाळी सणापूर्वी हक्काचा दिवाळी बोनस मिळायलाच हवा, अशी आक्रमक भूमिका कामगार नेते तथा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी उपमहापौर केशव घोळवे यांनी घेतली आहे. या महत्त्वपूर्ण मागणीचे निवेदन त्यांनी महापालिका महापौर रवी लांडगे यांना दिले आहे.
माजी उपमहापौर केशव घोळवे हे पिंपरी-चिंचवड शहरातील कामगार, कर्मचारी, सफाई कामगार, काच-कचरा कागदपत्र गोळा करणारे कामगार, आशा वर्कर्स, गटप्रवर्तक, बालवाडी शिक्षिका, पॅरामेडिकल स्टाफ, स्मशानभूमीमधील कामगार तसेच कोरोना काळातील जीव धोक्यात घालून सेवा बजावणारे योद्धे यांच्या हक्कासाठी सातत्याने आक्रमक लढा देत असतात. त्यांच्या या सातत्यपूर्ण भूमिकेमुळे सर्व स्तरातील कामगार जनतेमध्ये त्यांच्याविषयी अत्यंत आदरयुक्त आणि विश्वासू प्रतिमा निर्माण झाली आहे.
सध्या महापालिकेच्या वैद्यकीय विभागात हजारो कंत्राटी कामगार अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सेवा देत आहेत. कोरोना काळापासून ते आजतागायत अविरत सेवा बजावणाऱ्या या कामगारांना आर्थिक स्थैर्य मिळवून देणे महापालिका प्रशासनाची जबाबदारी आहे. दिवाळी सारख्या आनंदोत्सवात या कर्मचाऱ्यांना बोनस मिळाला तरच त्यांच्याही घरात खऱ्या अर्थाने दीपावली साजरी होईल, असे मत केशव घोळवे यांनी निवेदनात व्यक्त केले आहे.
तसेच, यापूर्वीही केशव घोळवे यांनी महापालिकेतील संघटित व असंघटित क्षेत्रातील शिक्षण विभागातील शिक्षण सेवकांचे प्रश्न, प्रभारी मुख्याध्यापकांना मुख्याध्यापक पदोन्नती मिळवून देणे यांसारख्या विविध प्रश्नांवर भरीव व यशस्वी योगदान दिले आहे. त्यांच्या या जनहितकारी व कामगारकल्याणकारी भूमिकेमुळे शहरात कामगारांचे वाली म्हणून त्यांची प्रतिमा अधिक दृढ होत आहे. महापौर रवी लांडगे यांनी या निवेदनाची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी कामगार वर्गाकडून केली जात आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

