22
माय मराठीचा साहित्यवारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज; ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’त मान्यवरांचे विचारमंथन!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान , दि. १२ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: मराठी साहित्याला दोन हजार वर्षांहून अधिक काळाची समृद्ध परंपरा लाभली आहे. मराठी साहित्यात आपला इतिहास, संस्कृती, संघर्ष, संवेदना आणि स्वप्ने यांचे प्रतिबिंब दिसते. काळानुसार साहित्याची भाषा आणि स्वरूप बदलले, तरी माणसाचे जीवन व त्याच्या भावना हेच मराठी साहित्याचे केंद्रस्थान राहिले आहे. हा समृद्ध साहित्यवारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे, असे ठाम मत साहित्य क्षेत्रातील दिग्गजांनी व्यक्त केले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’च्या निमित्ताने पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात ‘माय मराठीचे साहित्यविश्व’ या विषयावर विशेष चर्चासत्र पार पडले. ज्येष्ठ साहित्यिक राज अहेरराव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या चर्चासत्रात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र कांकरिया, राजन लाखे, ज्येष्ठ व्याख्याते राजेंद्र घावटे, आणि ज्येष्ठ लेखक प्रा. संजय पवार यांनी सहभाग घेतला.
“विविध भाषांच्या संपर्कातून आलेल्या शब्दांमुळे मराठी अधिक समृद्ध झाली. इंग्रजी साहित्याचा प्रभाव काही नाटके व कवितांवर दिसतो, तर अलीकडच्या काळात ग्रामीण व उपेक्षित घटकांतून निर्माण झालेले साहित्य हे मराठीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.” – डॉ. राजेंद्र कांकरिया
“यादवकालापासून मराठीला अभिजात दर्जा मिळेपर्यंतच्या प्रवासात संतपरंपरा व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा मोठा सांस्कृतिक आधार राहिला. मराठीच्या बोलीभाषांनाही प्रमाणभाषेइतकेच महत्त्व मिळाले पाहिजे.” – राजेंद्र घावटे
“‘लीळाचरित्र’ आणि ‘विवेकसिंधू’ हे मराठीतील आद्य ग्रंथ आहेत. १९व्या शतकानंतर साहित्याचे स्वरूप बदलले आणि आधुनिक मराठी साहित्याची दारे उघडली.” – प्रा. संजय पवार
“‘लीळाचरित्र’ हा आद्य गद्यग्रंथ तर ‘विवेकसिंधू’ हा आद्य पद्यग्रंथ मानला जातो. संत, पंत आणि तंत परंपरेने मराठी भाषेचे दालन समृद्ध केले आहे.” – राजन लाखे
अध्यक्षीय भाषणात बोलताना ज्येष्ठ साहित्यिक राज अहेरराव यांनी सांगितले की, “मराठी भाषेचे अभिजातपण टिकवण्यासाठी नव्या पिढीला तिच्या २ हजार वर्षांच्या इतिहासाची ओळख करून देणे आवश्यक आहे. सातवाहन राजा हाल यांच्या काळातील ‘गाथासप्तशती’ हा महाराष्ट्री प्राकृत भाषेतील गाथासंग्रह त्या काळातील लोकजीवन आणि लोकभावना समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे.”
या सोहळ्याचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन किशोर केदारी यांनी केले, तर आभार प्रशासन अधिकारी दत्तात्रय सूर्यवंशी यांनी मानले. या चर्चासत्राला पिंपरी-चिंचवडमधील रसिक, अभ्यासक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
