2
पीसीसीओईच्या ‘टीम अनंतम’ने पटकावला एस्ट्रोवर्स अक्षयान स्पर्धेत देशात प्रथम क्रमांक!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १० ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (PCET) आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग (PCCOE) मधील ‘टीम अनंतम – रॉकेटरी अँड स्पेस रिसर्च’ या विद्यार्थी संघाने राष्ट्रीय स्तरावरील ‘एस्ट्रोवर्स अक्षयान २०२६’ स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या स्पर्धेत सॉलिड रॉकेट मोटर लॉन्च कॅटेगरीमध्ये टीमने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे ‘एस्ट्रोवर्स’ या संस्थेमार्फत आयोजित केलेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेत देशभरातील नामांकित २० अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग घेतला होता. या सर्व संघांमध्ये पीसीसीओईच्या टीमने बाजी मारत प्रथम क्रमांकाचे ३० हजार रुपये, स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र पटकावले.
उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे झालेल्या या स्पर्धेत टीम अनंतमने तयार केलेले ‘अस्त्र’ नावाचे रॉकेट तब्बल ९७३ मीटर उंचीवर यशस्वीपणे झेपावले. विशेष म्हणजे, या स्पर्धेत रॉकेट यशस्वीपणे प्रक्षेपित करून सुरक्षितपणे रिकव्हर (आटोक्यात आणणारी) करणारी टीम अनंतम ही एकमेव यशस्वी टीम ठरली आहे. भारतीय एरोस्पेस क्षेत्राच्या दिशेने विद्यार्थी वर्गाने टाकलेले हे अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
विद्यार्थ्यांच्या या ऐतिहासिक यशाबद्दल बोलताना पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे म्हणाले, “टीम अनंतमने रॉकेटरी आणि स्पेस रिसर्च क्षेत्रात नवनवीन आव्हाने स्वीकारत अधिक उंची गाठली आहे. आमच्या विद्यार्थ्यांना भविष्यातील एरोस्पेस आणि स्पेस टेक्नॉलॉजी क्षेत्रातील क्षमता विकसित करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा संस्थेच्या वतीने उपलब्ध करून दिल्या जातील.”
या यशात पीईसीटीचे उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, उपसंचालक निळकंठ चोपडे, संशोधन व विकास अधिष्ठाता नरेंद्र देवरे, अधिष्ठाता डॉ. पद्माकर देशमुख, सहयोगी अधिष्ठाता अमित पंचवाडकर, प्रा. डॉ. जयेश चोरडिया आणि डॉ. अश्विनी शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
टीम अनंतम ही पीसीसीओई, पुणे येथील मोटर स्पोर्ट्स कौन्सिल अंतर्गत कार्यरत असलेली विद्यार्थी-नेतृत्व असलेली एरोस्पेस संशोधन संस्था आहे. या यशस्वी संघात फॅकल्टी कोऑर्डिनेटर प्रा. जयेश चोरडिया, टीम हेड विवेकानंद झांबरे यांच्यासह दिव्या पाटील, ओंकार पाटील, कुशल सरोदे, मानसी कटारिया, अनुष्का कालंत्रे, सोहम सपकाळ, साक्षवत भुसारे, प्रथम बोकेफोडे आणि माधव जोशी या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

