80
‘रेम्बो डेव्हलपर्स’चा मनमानी कारभार मोडीत; आकुर्डीतील १०० झोपडीधारकांवरील बेकायदेशीर कारवाईला ‘SRA’कडून स्थगिती!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी: लक्ष्मण प्रधान, दि. १३ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: आकुर्डी येथील अजिंठा नगर ‘C’ पत्रा शेड शेजारील सुमारे १०० गरीब झोपडीधारकांना कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता बेघर करण्याचा ‘रेम्बो डेव्हलपर्स’च्या विकासकाचा डाव भीमशक्ती सामाजिक संघटनेने उधळून लावला आहे. संघटनेच्या आक्रमक भूमिकेमुळे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे (SRA) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांनी या बेकायदेशीर कारवाईला तात्काळ स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत.
अजिंठा नगर परिसरातील १०० हून अधिक कुटुंबांवर बेघर होण्याची टांगती तलवार निर्माण झाली होती. विकसक ‘रेम्बो डेव्हलपर्स’कडून नियमांना धाब्यावर बसवून मनमानी पद्धतीने कारवाईचा प्रयत्न सुरू असल्याचे समजताच भीमशक्ती सामाजिक संघटनेचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सुरजभाऊ गायकवाड आणि युवा शहराध्यक्ष अक्षयभैया कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली.
संघटनेच्या शिष्टमंडळाने थेट SRA कार्यालयात जाऊन मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) खडके साहेब यांची भेट घेतली आणि झोपडीधारकांवर होत असलेल्या अन्यायाची सनदशीर मार्गाने जाणीव करून देत निवेदन सादर केले.
भीमशक्ती संघटनेने मांडलेली बाजू आणि वस्तुस्थिती लक्षात घेत CEO खडके यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेतली. त्यांनी घटनास्थळीच ‘रेम्बो डेव्हलपर्स’च्या विकसकाला दूरध्वनीवरून कडक शब्दांत ताकीद देत पुढील आदेश झोपडीधारकांवर कोणतीही जबरदस्ती अथवा निष्कासनाची कारवाई तत्काळ थांबवावी. नियमानुसार सर्व १०० झोपडीधारकांची आधी एसआरए पात्रतेची प्रक्रिया पूर्ण करावी आणि त्यानंतरच त्यांना योग्य त्या संक्रमण शिबिरात (Transit Camp) सन्मानपूर्वक स्थलांतरित करण्यात यावे.
नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष समजून घेण्यासाठी आणि प्रकरणाचा सखोल छडा लावण्यासाठी SRA चे CEO खडके यांनी येत्या शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) सुरजभाऊ गायकवाड, अक्षयभैया कसबे आणि स्थानिक कार्यकर्त्यांसोबत अजिंठा नगरमधील बाधित क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे मान्य केले आहे.
“गोरगरिबांच्या हक्काच्या छतावर डल्ला मारणाऱ्या बिल्डरशाहीचा मनमानी कारभार अजिबात खपवून घेतला जाणार नाही. बाधितांना न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील,” असा इशारा या वेळी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे शहराध्यक्ष सुरजभाऊ गायकवाड आणि युवा अध्यक्ष अक्षयभैया कसबे यांनी दिला आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
