24
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन व निर्मूलन विभागात ‘शून्य कचरा कार्यालय’ उपक्रमाचा शानदार शुभारंभ!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १२ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून झोपडपट्टी पुनर्वसन व निर्मूलन विभागाने ‘शून्य कचरा कार्यालय’ (Zero Waste Office) या अत्यंत स्तुत्य आणि अभिनव उपक्रमाची सुरुवात केली आहे. महापालिकेच्या चिंचवड येथील झोपडपट्टी पुनर्वसन व निर्मूलन विभागाच्या मुख्य कार्यालयात अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम आणि विक्रांत बगाडे यांच्या हस्ते या उपक्रमाचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला.
“पिंपरी-चिंचवडसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरात कचरा व्यवस्थापन हे मोठे आव्हान आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक कार्यालयाने स्वतःच्या स्तरावर पुढाकार घेऊन कचऱ्याचे वर्गीकरण आणि योग्य विल्हेवाट लावण्यास सुरुवात केल्यास या आव्हानावर मात करता येईल,” असे प्रतिपादन या वेळी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी केले.
झोपडपट्टी पुनर्वसन व निर्मूलन विभागाचे उप आयुक्त अण्णा बोदडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. कार्यालयात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे योग्य वर्गीकरण, पुनर्वापर आणि पुनर्प्रक्रिया करून अंतिम विल्हेवाटीसाठी पाठवल्या जाणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण शून्य किंवा नगण्य ठेवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
कार्यालयातील मुख्य सुविधा व वैशिष्ट्ये- काच, रद्दी कागद, धातू, स्वच्छ पॉलिथिन, स्वच्छ प्लास्टिक आणि ई-कचरा संकलनासाठी स्वतंत्र डब्यांची (Bins) व्यवस्था. ओल्या कचऱ्यावर कार्यालयाच्या आवारातच प्रक्रिया करण्यासाठी ‘ऑरगॅनिक कंपोस्ट ड्रम’ची उभारणी. अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये कचरा विलगीकरण आणि टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्याच्या संस्कृतीला प्रोत्साहन.

अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, “भविष्यकाळात महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीपासून सुरुवात करून सर्वच विभागीय कार्यालयांमध्ये ‘शून्य कचरा कार्यालय’ ही संकल्पना राबवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील.”
उद्घाटन सोहळ्यानंतर दोन्ही अतिरिक्त आयुक्तांनी चिंचवड येथील कौशल्यम लाईटहाऊस प्रकल्पाला भेट देऊन तेथील प्रशिक्षण वर्गांची पाहणी केली. शहरात १० ठिकाणी सुरू असलेल्या या प्रकल्पांतर्गत तरुणांना मोफत कौशल्याधारित प्रशिक्षण दिले जात आहे.
या वेळी बोलताना अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी पारंपरिक अभ्यासक्रमांसोबतच ग्राफिक डिझायनिंग, डिजिटल मार्केटिंग, एआय (AI), व्हिडिओ एडिटिंग, मोशन ग्राफिक्स आणि परदेशी भाषांचे प्रशिक्षण देण्यावर भर देण्याचे निर्देश दिले. तसेच, प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष रोजगार मिळतो की नाही याचा दर तीन महिन्यांनी नियमित रिव्ह्यू (अहवाल) घेण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी दिल्या.
“शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता कचरा व्यवस्थापन ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. ‘शून्य कचरा कार्यालय’ या उपक्रमामुळे कार्यालयीन स्तरावर ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती आणि सुक्या कचऱ्याच्या पुनर्वापराला गती मिळेल. महापालिकेच्या सर्व कार्यालयांत हा उपक्रम टप्प्याटप्प्याने लागू करून स्वच्छ, सुंदर व हरित पिंपरी-चिंचवड घडवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.”— डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
या कार्यक्रमास उप आयुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आयुक्त दशरथ कांबळे, कार्यकारी अभियंता शेखर गुरव, आसरा फाऊंडेशनच्या अध्यक्षा अर्चना मोरे, कौशल्यम लाईटहाऊस प्रकल्प व्यवस्थापक अमृता बहुलेकर, आयपीसीए प्रतिनिधी दत्ता हेंद्रे, वैभव नसुरडे, आशिष कुंभलकर यांच्यासह महापालिका कर्मचारी व प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

