42
स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्टला संत तुकाराम नगरमध्ये निघणार भव्य ‘तिरंगा रॅली’; कामगारनेते यशवंत भोसले यांचे नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. १४ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: भारतीय स्वातंत्र्याच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनानुसार, उद्या शनिवारी (दि. १५ ऑगस्ट २०२६) संत तुकाराम नगर येथे भव्य ‘तिरंगा रॅली’ चे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टी (पिंपरी-चिंचवड शहर), राष्ट्रीय श्रमिक आघाडी आणि संत तुकाराम नगर सहकारी गृहरचना संस्था मर्यादित यांच्या संयुक्त विद्यमाने या देशभक्तीपर रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगारनेते यशवंत भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ही रॅली १५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता संत तुकाराम नगर येथील राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या कार्यालयापासून सुरू होईल. सुमारे ३ किलोमीटर अंतराचा टप्पा पार करून ही रॅली सायंकाळी ६ वाजेपर्यंत पुन्हा कार्यालयाच्या ठिकाणी येईल आणि तेथे तिचे सभेत रूपांतर होईल.
या भव्य तिरंगा रॅलीस भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, चिंचवडचे आमदार शंकर जगताप, भोसरीचे आमदार महेश लांडगे, विधान परिषद सदस्या उमा खापरे, आमदार अमित गोरखे, महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, गटनेते प्रशांत शितोळे यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रांतील प्रमुख मान्यवर व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या कार्यालयापासून सुरु होणारी ही रॅली गंगानगर, महेशनगर, ॲटलास कॉलनी, डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय, वायसीएम (YCM) रुग्णालय आणि तेथून संपूर्ण फेरा मारून आचार्य अत्रे रंगमंदिरामार्गे पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी समाप्त होईल. रॅलीत हजाराहून अधिक नागरिक व कामगार सहभागी होणार असून, सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाला योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत.
“गेली ३० वर्षे १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या कार्यालयावर ध्वजारोहण केले जाते. तिरंगा हा आपल्या देशाचा स्वाभिमान आणि अभिमान आहे. देश स्वतंत्र ठेवण्यासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या त्यागाचे स्मरण करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. पिंपरी-चिंचवड ही कामगारांची नगरी आहे. देशाच्या स्वाभिमानासाठी १५ ऑगस्टच्या सुट्टीच्या दिवशी सर्व कामगार, नागरिक आणि देशप्रेमींनी या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.”— यशवंत भोसले (अध्यक्ष, राष्ट्रीय श्रमिक आघाडी)
रॅलीच्या सांगतेनंतर आयोजित सभेत उपस्थित मान्यवर व लोकप्रतिनिधी मार्गदर्शन करणार आहेत.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

