27
समाजहिताच्या उपक्रमांतून गणेश मंडळांचा आदर्शवत सहभाग — उपमहापौर शर्मिला बाबर
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १४ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड” गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक परंपरेसोबतच सामाजिक प्रबोधन आणि विधायक उपक्रमांना चालना देण्याचे काम शहरातील गणेश मंडळांकडून केले जात आहे. विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश पोहोचविणाऱ्या गणेश मंडळांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन उपमहापौर शर्मिला बाबर यांनी व्यक्त केले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरातील गणेशोत्सव मंडळांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष स्पर्धेच्या भव्य पारितोषिक वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात उत्कृष्ट आणि उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या विविध गणेश मंडळांना सन्मानित करण्यात आले.
उपमहापौर शर्मिला बाबर पुढे म्हणाल्या की, गणेशोत्सव हा केवळ उत्सवापुरता मर्यादित न राहता सामाजिक परिवर्तनाचे माध्यम ठरावा, यासाठी मंडळांनी सामाजिक प्रश्नांवर जनजागृती करणारे उपक्रम राबविणे गरजेचे आहे. शहरातील गणेश मंडळांकडून सामाजिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर उपक्रम राबविले जात असून, त्यातून समाजात सकारात्मक वातावरण निर्माण होत आहे. अशा उपक्रमांना प्रोत्साहन मिळाल्यास गणेशोत्सवाची सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होईल.
या सोहळ्यास आमदार हेमंत रासने, आमदार अमित गोरखे, महापौर रवि लांडगे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, कला, क्रीडा, सांस्कृतिक व पर्यटन समितीचे सभापती कैलास कुटे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, चिंचवड देवस्थानचे विश्वस्त मंदार देव महाराज यांच्यासह शहरातील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपमहापौर बाबर यांनी सर्व पारितोषिकप्राप्त गणेश मंडळांचे मनापासून अभिनंदन केले. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, संस्कृती आणि समाजहिताची भावना अधिक बळकट व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी या वेळी व्यक्त केली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

