5
‘माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा’; २१ ऑगस्टला महाराष्ट्रात साजरा होणार ‘जलसंधारण दिन’!
मुंबई/पिंपरी, प्रतिनिधी आकाश कांबळे दि. १४ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
मुंबई: महाराष्ट्राच्या विकासाच्या वाटचालीत माती आणि पाणी या दोन नैसर्गिक संसाधनांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेती, ग्रामीण अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि मानवी जीवन यांचा थेट संबंध या घटकांशी असल्याने मातीचे संवर्धन आणि पाण्याचे शाश्वत व्यवस्थापन ही आता व्यापक लोकचळवळ बनणे काळाची गरज आहे. याच विचारातून राज्यात यंदा २१ ऑगस्ट हा ‘जलसंधारण दिन’ म्हणून अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा हा दिवस त्यांच्या जलसंधारणविषयक दूरदृष्टीला अभिवादन करण्यासोबतच राज्याच्या जलसुरक्षित भविष्यासाठी नव्या संकल्पाची सुरुवात ठरणार आहे.
१९९१ ते १९९३ या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना दिवंगत सुधाकरराव नाईक यांनी दुष्काळाचे आव्हान केवळ मोठ्या धरणांनी सुटणार नाही हे ओळखले होते. त्यांनी पाणलोट विकास, भूजल पुनर्भरण, नाला बांध, पाझर तलाव आणि माती बंधाऱ्यांवर भर देत ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा ऐतिहासिक मूलमंत्र दिला. जलसंधारणाला लोकसहभागाची जोड देणाऱ्या या महान नेत्याचे कार्य आजही दिशादर्शक आहे.
पूर्वी १० मे हा त्यांचा स्मृतिदिन ‘जलसंधारण दिन’ म्हणून पाळला जात होता. मात्र, जन्मदिवस अधिक उत्साहपूर्ण वातावरणात आणि लोकसहभागाने साजरा व्हावा, यासाठी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या पुढाकाराने व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने आता दरवर्षी २१ ऑगस्ट हा ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय घेण्यात आला आहे.
१५ ते २१ ऑगस्ट दरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’, तर १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत राज्यभर ‘जलसंधारण अभियान’ राबवले जाईल. ‘ २१ ऑगस्ट रोजी सकाळी राज्यातील सर्व जिल्ह्यांत ३ किलोमीटरची महा वॉकेथॉन आयोजित केली जाईल. यात ३ लाखांहून अधिक नागरिक, विद्यार्थी, युवक, महिला, लोकप्रतिनिधी व अधिकारी प्रत्यक्ष सहभागी होतील. यावेळी जलसंधारणाची सामूहिक शपथ घेतली जाईल. १५ ते ३० वयोगटातील युवकांसाठी ३० ते ६० सेकंदांच्या इन्स्टाग्राम रिल्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. #SaveSoilSaveWater या हॅशटॅगचा वापर करून युवक कल्पकतेने पाणी आणि माती संवर्धनाचा संदेश देतील. निबंध, चित्रकला, पोस्टर स्पर्धा आणि ‘एक शाळा-एक शोषखड्डा’ यांसारख्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांमध्ये जलसंधारणाचे संस्कार रुजवले जातील. अभियानादरम्यान जलयुक्त शिवार २.०, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार, शेततळी निर्मिती आणि अमृत सरोवरांच्या स्वच्छता व वृक्षारोपणाच्या कामांना गती दिली जाणार आहे.
हवामान बदल आणि घटत्या भूजल पातळीच्या पार्श्वभूमीवर माती व पाण्याचे जतन करणे ही केवळ शासनाची नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. २१ ऑगस्टचा ‘जलसंधारण दिन’ हा महाराष्ट्राला जलसंपन्न बनवण्यासाठी महासंकल्प दिन ठरेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
