56
पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा मार्ग मोकळा; महासंघासोबत ५ वर्षांचा करारनामा करण्यास स्थायी समितीची मंजुरी!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १४ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दरवर्षी देण्यात येणाऱ्या दिवाळी बोनस आणि सानुग्रह अनुदानाबाबत अखेर मोठा निर्णय झाला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबनराव झिंजुर्डे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीला व पाठपुराव्याला मोठे यश आले असून, सन २०२५-२६ ते सन २०२९-३० अशा आगामी ५ वर्षांच्या कालावधीसाठी करारनामा करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.
कर्मचारी महासंघाने दिवाळी प्रथा बोनस व सानुग्रह अनुदान देण्याबाबत ५ वर्षांचा प्रदीर्घ करारनामा करण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार कामगार कल्याण मंडळाने स्थायी समितीसमोर हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला होता.
महापालिका आस्थापनेवरील सर्व अधिकारी, कर्मचारी, शिक्षण विभाग, वैद्यकीय विभागाचे कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना दरवर्षी ८.३३ टक्के प्रथा बोनस आणि २५ हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले जात होते.
मात्र, स्थायी समितीने या मूळ प्रस्तावात महत्त्वाची उपसूचना मंजूर केली आहे. समितीने सानुग्रह अनुदानाची रक्कम २५ हजार रुपयांवरून थेट ३० हजार रुपये करण्याची उपसूचना स्वीकृत केली आहे. उपसूचनेसह हा प्रस्ताव आता अंतिम मंजुरीसाठी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेकडे पाठवण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवर सध्या ६ हजारांहून अधिक अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. गेल्या वर्षी महापालिकेने दिवाळी बोनस व सानुग्रह अनुदानावर ६२ कोटी रुपयांहून अधिक खर्च केला होता. यंदा अनुदानात वाढ झाल्याने या खर्चाच्या रक्कमेत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ५ वर्षांचा करार निश्चित झाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
