4
मातंग समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांचे मोफत पूर्व प्रशिक्षण; ‘आर्टी’तर्फे ऑनलाईन अर्ज करण्याचे सुनील वारे यांचे आवाहन!
मुंबई/पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. १३ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी – ARTI), मुंबई मार्फत राज्यातील मातंग व तत्सम उपजातींमधील विद्यार्थ्यांसाठी युपीएससी, एमपीएससी, बँकिंग, पोलीस व सैन्य भरती यांसारख्या विविध स्पर्धा परीक्षांचे मोफत पूर्व प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या योजनेचा राज्यातील जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ‘आर्टी’चे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी युपीएससी (UPSC), एमपीएससी (MPSC), महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (MES), न्यायिक सेवा (JMFC), एसएससी (SSC), आयबीपीएस (IBPS), रेल्वे, एलआयसी (LIC), नाबार्ड तसेच पोलीस व सैन्य भरती परीक्षांसाठी ६ ते ११ महिने कालावधीचे मोफत पूर्व प्रशिक्षण खाजगी नामांकित संस्थांमार्फत ऑफलाईन पद्धतीने दिले जाणार आहे. हे अनिवासी प्रशिक्षण दिल्ली तसेच महाराष्ट्रातील विविध प्रमुख केंद्रांवर उपलब्ध असणार आहे.
प्रशिक्षण कालावधीत विद्यार्थ्यांना आर्थिक टंचाई भासू नये, यासाठी आर्टीतर्फे दरमहा १०,००० ते १३,००० रुपये विद्यावेतन (Stipend) दिले जाणार आहे. याशिवाय पुस्तकांचा संच, अभ्यास साहित्य आणि इतर अनुषंगिक खर्चासाठी एकरकमी १३,००० ते १८,००० रुपयांचे आर्थिक साहाय्य थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर वर्ग केले जाईल.
अनुसूचित जातीतील मांग, मातंग, मिनिमादिग, दखनी-मांग, मांग-म्हशी, मदारी, गारुडी, राधेमांग, मांग-गारोडी, मादगी व मादिगा या समाजातील पदवीधर उमेदवार या योजनेसाठी पात्र आहेत. ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर विद्यार्थ्यांची निवड सामयिक प्रवेश परीक्षेद्वारे (CET) गुणवत्तेनुसार केली जाईल. पात्र उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ
[http://articet2026.cbtexam.in](http://articet2026.cbtexam.in) ला भेट देऊन ऑनलाईन अर्ज भरावा. महाराष्ट्र शासनाच्या सर्वंकष धोरणानुसार टीआरटीआय (TRTI) संस्थेमार्फत राज्यातील सर्व संशोधन व प्रशिक्षण संस्थांच्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रमांचे संनियंत्रण व अंमलबजावणी केली जाणार असल्याचेही सुनील वारे यांनी स्पष्ट केले.-
अर्ज सुरू करण्याचा दिनांक: ०९ ऑगस्ट २०२६
-
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक: २३ ऑगस्ट २०२६
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
