27
वाल्हेकरवाडी येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरी!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान , दि. १४ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरातील वाल्हेकरवाडी येथे साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती अत्यंत उत्साहात, सामाजिक भान जपत आणि विविध विधायक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. परिसरातील सर्व समाजबांधवांनी एकत्र येत या प्रसंगी जातीय सलोखा आणि एकतेचा संदेश दिला.
कार्यक्रमाची सुरुवात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाली. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या अलौकिक साहित्यिक, सामाजिक आणि क्रांतिकारी कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा जागर केला. अण्णाभाऊंनी आपल्या जादुई लेखणीतून वंचित, शोषित व कष्टकरी समाजाचा आवाज बुलंद केला, त्यांचे विचार आजही समाजाला योग्य दिशा देणारे आहेत, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
जयंतीचे औचित्य साधून परिसरात भव्य स्वच्छता अभियान राबवण्यात आले. तसेच गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप आणि समाजप्रबोधनपर व्याख्यानाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्यास ‘शिवशाही शासन पक्षाचे’ संस्थापक प्रमुख लोकसेवक युवराज दाखले, प्रदेशाध्यक्ष कृष्णा दादा साबळे, शिवशाही माथाडी कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सचिन दोनगहू, शिवशाही महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष उषामाई कांबळे, शंकर भाऊ भडकवाड आदी प्रमुख पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ‘तुळजाभवानी मित्र मंडळ’ आणि ‘शिवशाही माथाडी कामगार आघाडी’ पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष गौतम गायकवाड, प्रदीप कसबे, अभिजित कसबे, नितीन शिंदे, बाबा शिंदे, विशाल ठोंबरे, विश्वा साठे, आदर्श धावारे यांच्यासह वाल्हेकरवाडीतील सर्व कार्यकर्ते, स्थानिक युवक मंडळे आणि नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

