आमझरी बनणार ‘मधाचे गाव’; आदिवासी महिलांना शास्त्रोक्त मधमाशा पालनाचे प्रशिक्षण सुरू
अमरावती,चिखलदरा, २२ जानेवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
अमरावती, चिखलदरा : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या महत्त्वाकांक्षी ‘मधाचे गाव’ योजनेअंतर्गत चिखलदरा तालुक्यातील आमझरी या गावाची निवड करण्यात आली आहे. या योजनेद्वारे मेळघाटातील मुबलक नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करून स्थानिक आदिवासी महिलांना ‘सातेरी’ मधमाशा पालनाचे विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे. यामुळे आदिवासी बांधवांना रोजगाराची नवीन संधी उपलब्ध झाली आहे.
राज्यात पहिल्या टप्प्यात निवडण्यात आलेल्या १० गावांमध्ये आमझरीचा समावेश करण्यात आला आहे. निसर्गाचे रक्षण करणे, दर्जेदार मध उत्पादन आणि त्यापासून तयार होणाऱ्या उप-उत्पादनांची विक्री व्यवस्था करणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमामुळे आमझरी हे गाव ‘मधुपर्यटना’चे प्रमुख केंद्र म्हणून नावारूपास येणार आहे.
जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या गावातील २१ महिलांना हे प्रशिक्षण दिले जात आहे. भविष्यात गावातील प्रत्येक घरातील किमान एका सदस्याला प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या प्रशिक्षणामध्ये महिलांना खालील तांत्रिक ज्ञान दिले जात आहे:
-
मधमाशांच्या जाती: मधमाशांच्या विविध जाती आणि त्यांचे गुणधर्म.
-
शास्त्रोक्त संकलन: आग्या मधमाशांच्या वसाहतींमधून मध काढण्याची तांत्रिक पद्धत.
-
उप-उत्पादने: मेण आणि रॉयल्टी जेली यांसारख्या उप-उत्पादनांची निर्मिती.
केवळ प्रशिक्षणच नव्हे, तर गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी येथे मधपेट्यांचे वाटप, ‘मधुबना’ची स्थापना आणि सामुहिक सुविधा केंद्राची निर्मिती करण्यात येत आहे. तसेच पर्यटकांच्या माहितीसाठी एक भव्य माहिती दालनही उभारले जाणार आहे. या सर्व उपक्रमांमुळे आमझरीच्या आर्थिक उत्पन्नात मोठी भर पडणार असल्याची माहिती जिल्हा ग्रामोद्योग अधिकाऱ्यांनी दिली आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


