भजनाच्या चैतन्यमय ठेक्यावर रंगली भक्ती अन् आरोग्याची योगसाधना! पिंपळे सौदागरमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २१ जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: “योग ही केवळ शारीरिक व्यायामाची पद्धत नसून, ते शरीर, मन आणि आत्म्याला जोडणारे एक प्राचीन भारतीय शास्त्र आहे. आजच्या आधुनिक आणि धावपळीच्या युगात मानसिक शांतता व आंतरिक निरोगीपणा मिळवण्यासाठी योग हाच एकमेव उत्तम आणि शाश्वत मार्ग आहे. आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या सातत्यपूर्ण जागतिक प्रयत्नांमुळे भारताचा हा प्राचीन ठेवा आज संपूर्ण जगभरात आरोग्याचा महामंत्र बनला आहे,” असे प्रतिपादन भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा नगरसेवक श्री. शत्रुघ्न (बापू) काटे यांनी केले.
‘आंतरराष्ट्रीय योगदिना’चे औचित्य साधून रविवारी (दि. २१ जून) सकाळी ठीक ६:३० वाजता पिंपळे सौदागर येथील प्रसिद्ध शिवछत्रपती लिनिअर अर्बन गार्डन येथे भव्य सामूहिक योग आणि प्राणायाम शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पार्टी रहाटणी-पिंपळे सौदागर आणि जागतिक कीर्तीच्या ‘द आर्ट ऑफ लिविंग’ (The Art of Living) संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिराला परिसरातील नागरिकांचा अभूतपूर्व आणि ऐतिहासिक प्रतिसाद लाभला. या शिबिरात शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी स्वतः नागरिकांच्या खांद्याला खांदा लावून पूर्ण वेळ योगसाधना केली.

या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण योग सोहळ्याचे मुख्य आणि सर्वात मोठे आकर्षण म्हणजे ‘द आर्ट ऑफ लिविंग’चे मुख्य मार्गदर्शक सत्यजित भैया यांनी कठीण योगासने आणि प्राणायाम अत्यंत सोप्या पद्धतीने उपस्थितांकडून करून घेतले. सत्यजित भैया यांनी व्यासपीठावरून भजनांच्या अत्यंत गोड, लयबद्ध आणि चैतन्यमय ठेक्यावर योगाचे प्रकार करून घेतल्यामुळे संपूर्ण अर्बन गार्डन परिसरात एक दैवी आणि सकारात्मक ऊर्जेचे वातावरण निर्माण झाले होते. सत्यजित भैया यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “दैनंदिन जीवनात योगाची अचूक पद्धत आणि त्याचे सातत्य आपल्या शरीराला व मनाला आजारांपासून कसे दूर ठेवू शकते.”
या शिबिरात दोन विशेष सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली. अवघ्या ५ वर्षांच्या सई थेऊरकर या चिमुकलीने व्यासपीठावरून अत्यंत कठीण आणि लवचिक योगासने इतक्या सहजतेने सादर केली की उपस्थित सर्व नागरिक आणि मान्यवर थक्क झाले. तिच्या या कलेला उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. प्रसिद्ध योग प्रशिक्षक प्रीती मानकर यांनी संगीताच्या वेगवान तालावर ‘टाळी योगा’ (Clap Yoga) या अत्यंत नाविन्यपूर्ण योग प्रकाराचे प्रात्यक्षिक दाखवले. यामुळे पहाटेच्या शांत वातावरणात सर्व नागरिकांमध्ये एक नवा जोश आणि ऊर्जा निर्माण झाली.
पिंपळे सौदागरच्या या भव्य योग सोहळ्याला परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि भाजपचे नेते उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने भाजप शहराध्यक्ष श्री. शत्रुघ्न (बापू) काटे, नगरसेविका सौ. कुंदाताई भिसे, नगरसेविका सौ. अनिताताई काटे, पवना सहकारी बँकेचे संचालक श्री. जयनाथ काटे, ज्येष्ठ समाजसेवक श्री. संदेश काटे पाटील, श्री. संजयशेठ भिसे, श्री. संदीपशेठ काटे, श्री. दिनेश काटे पाटील, आणि श्री. मनोजराव ब्राह्मणकर उपस्थित होते.
तसेच ‘द आर्ट ऑफ लिविंग’च्या वतीने अमित मगर, राजेश पाटील, सौ. सुप्रिया पाटील, प्रवीणशेठ कुंजीर, बाळकृष्ण परघळे, दीपक गांगुर्डे, समीर देवरे, विजय पाटील, आणि श्रीमती शीतल पटेल यांच्यासह शेकडो अबालवृद्ध, तरुण व महिला भगिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अत्यंत नेटके, बहारदार आणि सुव्यवस्थित सूत्रसंचालन श्री. सागर बिरारी यांनी केले. उपस्थितांनी शेवटी ‘रोज योग, रोज आरोग्य’ असा आरोग्याचा दृढ संकल्प करत कार्यक्रमाची सांगता केली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

