चिमुरड्यांच्या लवलवीत शरीराने वेधले लक्ष! चऱ्होलीतील पंडित जवाहरलाल नेहरू शाळेत रंगला बालकांचा अनोखा ‘योग धडा’
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, २० जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
चऱ्होली: योगाचे महत्त्व केवळ मोठ्या माणसांपुरते मर्यादित न ठेवता, अगदी लहान वयापासूनच मुलांच्या मनावर आरोग्याचे संस्कार बिंबवण्यासाठी चऱ्होली बुद्रुक येथील पिंपरी-चिंचवड महानगरपालिका संचलित पंडित जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळा आणि दुर्गा बाल विद्यामंदिर बालवाडी यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त एका अत्यंत गोड व वैविध्यपूर्ण ‘योग धड्या’चे आयोजन करण्यात आले होते. वर्गात एरवी दंगामस्ती करणाऱ्या चिमुकल्यांनी जेव्हा शांतपणे चटईवर बसून, डोळे मिटून ध्यान लावले आणि ‘ॐ’चा उच्चार केला, तेव्हा तो सोहळा पाहून उपस्थित पालक व शिक्षकांचे मन सुखावले.या अनोख्या आणि आकर्षक योग वर्गात बालवाडीतील लहान मुलांना विविध रंजक खेळ आणि प्राण्यांच्या सोप्या हालचालींच्या माध्यमातून योगाचे धडे देण्यात आले.

वर्गात खेळता खेळता मुलांनी ताडासन, वृक्षासन, शशांहासन आणि फुलपाखरू आसन (बद्धकोणासन) यांसारखी सोपी योगासने अत्यंत आनंदाने केली. मुलांच्या लवलवीत शरीराच्या लवचिक हालचाली आणि त्यांच्या चेहऱ्यावरील निरागस हास्य पाहून संपूर्ण परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधले गेले.
लहान वयातच मुलांची एकाग्रता वाढावी, त्यांचा शारीरिक व मानसिक विकास सुदृढ व्हावा आणि त्यांना निरोगी जीवनशैलीची गोडी लागावी, हा या अभिनव उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
हा देखणा आणि यशस्वी उपक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता रोकडे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. बालवाडीतील अगदी लहान चिमुकल्यांना खेळकर वातावरणात योगाचे महत्त्व समजावून सांगत, त्यांच्याकडून अचूकपणे आसने करून घेण्यासाठी बालवाडी शिक्षिका सौ. सीमा सुनील भोसले आणि सौ. संगीता चंद्रकांत रोकडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
शिक्षिकांनी घेतलेल्या या अथक परिश्रमांचे आणि चिमुकल्यांच्या या मनमोहक योग वर्गाचे चऱ्होली परिसरातील नागरिक, पालक आणि शिक्षण वर्तुळातून भरभरून कौतुक होत आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

