अनैतिक संबंधातून तरुणाचा काटा काढला; २० दिवसांनंतर चाकण पोलिसांकडून छिन्नविच्छिन्न मृतदेहाचे गूढ उकल, ३ आरोपींना अटक
पिंपरी/चाकण/बिरदवडी प्रतिनिधी शाम सोनवणे, ३ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
चाकण/बिरदवडी : चाकण उत्तर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बिरदवडी येथे स्मशानभूमीजवळ आढळलेल्या एका अनोळखी तरुणाच्या खुनाचे रहस्य उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. कोणतीही ओळख पटू नये म्हणून चेहरा दगडाने ठेचून करण्यात आलेल्या या निर्घृण खुनाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी सलग २० दिवस अहोरात्र तपास केला. अनैतिक संबंधांच्या वादातून हा खून झाल्याचे समोर आले असून, पोलिसांनी एका महिलेसह तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
११ जानेवारी २०२६ रोजी मौजे बिरदवडी गावच्या स्मशानभूमीमागील ओढ्यालगत एका २५ ते ३० वर्षीय तरुणाचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत आढळला होता. अज्ञात आरोपीने धारदार हत्याराने डोक्यावर वार करून आणि नंतर दगडाने चेहरा छिन्नविच्छिन्न करून त्याची हत्या केली होती. ओळख पटू नये यासाठी आरोपीने मृताचा मोबाईल आणि कागदपत्रेही लंकावून नेली होती.
मृताची ओळख पटवणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासले, कामगार अड्ड्यांवर फोटो दाखवले आणि सोशल मीडियाचा वापर केला. तपासादरम्यान एका संशयास्पद मोपेड गाडीची माहिती मिळाली. त्या गाडीच्या मालकाकडे चौकशी केली असता, त्याने ७ जानेवारी रोजी आपली गाडी मित्र निखिल चव्हाण याला वापरायला दिल्याचे सांगितले.
पोलिसांनी संशयित निखिल नानासाहेब चव्हाण (वय २१) याला ताब्यात घेऊन विश्वासात घेतले असता त्याने खुनाची कबुली दिली. मृताचे नाव मुंजा धोंडीबा नरहिरे (वय २५, रा. गंगाखेड) असे होते. मुंजा याचे आरोपी निखीलची आई उथा नानासाहेब चव्हाण (वय ४०) हिच्याशी अनैतिक संबंध होते. मुंजा तिला त्रास देत असल्याने निखीलने आपला मित्र स्वप्नील नरहरी पारधी (वय १९) याच्या मदतीने त्याला संपवण्याचा कट रचला.
७ जानेवारी रोजी आरोपींनी मुंजा याला गंगाखेडहून चाकणला बोलावून घेतले. त्याला दुचाकीवर बसवून दारू पिण्याच्या बहाण्याने बिरदवडी येथील निर्मनुष्य ठिकाणी नेले. तिथे दारू पीत असताना निखील आणि स्वप्नीलने कोयत्याने मुंजाच्या डोक्यावर व तोंडावर सपासप वार केले. त्याचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यावर दगडाने चेहरा ठेचला आणि तिथून पसार झाले.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर आणि उपायुक्त मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, गुन्हे निरीक्षक विनोद पाटील, उपनिरीक्षक चंद्रशेखर मोरखंडे, सुनील शिंदे, मैरोबा यादव, प्रितम ढमढेरे, योगेश कोळेकर, शिवाजी लोखंडे, महेश कोळी, शरद खैरनार आणि सुमित जगझाप यांनी ही क्लिष्ट कारवाई पूर्ण केली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
