क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त ‘कष्टकरी संघर्ष महासंघा’कडून कृतज्ञतापूर्वक अभिवादन!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे , दि. ३ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: स्वातंत्र्यलढ्यातील थोर देशभक्त, झुंजार नेते आणि महात्मा जोतिराव फुले व छत्रपती शाहू महाराजांचा पुरोगामी वारसा निष्ठेने चालवणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त कष्टकरी संघर्ष महासंघाच्या वतीने पिंपरी येथे त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
क्रांतिसिंह नाना पाटील यांचा सुरुवातीच्या काळात सत्यशोधक चळवळीकडे मोठा कल होता. समाजातील अनिष्ट चालीरीती, अंधश्रद्धा, हुंडाप्रथा आणि अस्पृश्यता त्यांना अत्यंत अस्वस्थ करत असे. या सामाजिक कुप्रथा नष्ट करण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आणि लढा उभारला.
१९४२ च्या ऐतिहासिक ‘चले जाव चळवळीत’ (भारत छोडो आंदोलन) नाना पाटील अत्यंत सक्रियपणे सहभागी झाले होते. इंग्रज सरकारच्या जुलमी तावडीतून सुटण्यासाठी त्यांनी भूमीगत राहून आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला. या संघर्षाच्या काळात त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगेावा लागला; मात्र डगमगून न जाता त्यांनी भूमीगत राहूनच स्वातंत्र्यापूर्वीच तब्बल १५०० गावांना ब्रिटिश गुलामगिरीतून मुक्त केले होते.
सातारच्या भूमीत त्यांनी आपल्या निष्ठावंत सहकाऱ्यांच्या मदतीने ब्रिटिशांना थेट आव्हान देत ‘प्रतिसरकार’ स्थापन केले. इंग्रजांची पोलीस ठाणी, टपाल कार्यालये आणि सरकारी बँकांवर हल्ले चढवून ब्रिटिशांची प्रशासकीय व्यवस्था पूर्णपणे कोलमडवून टाकली आणि स्वतःची स्वतंत्र, समांतर शासनव्यवस्था उभी केली.
या प्रतिसरकारच्या कार्यक्षेत्रात जर कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याने जुलमाने सारा वसूल केला किंवा ब्रिटिशांसाठी हेरगिरी केली, तर त्याला कडक शासन केले जात असे. सर्वसामान्यांचा छळ करणाऱ्या पाटील व तलाठ्यांना हे प्रतिसरकार कठोर शिक्षा देत असे. इंग्रजांचे हस्तक आणि गद्दारांच्या पायावर लोखंडी पत्रे ठोकण्याची कडक शिक्षा दिली जात असल्याने त्यांच्या या समांतर सरकारला लोक प्रेमाने आणि भीतीने ‘पत्री सरकार’ म्हणून ओळखू लागले.
अशा या थोर क्रांतीसूर्याच्या आणि बहुजन प्रतिभेच्या महान नेत्याला जयंतीनिमित्त कष्टकरी संघर्ष महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विनम्र अभिवादन केले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
