news
दिल्ली मतदार यादी पुनरीक्षण प्रकरण सर्वोच्च न्यायालयात; बाधित मतदारांची नावे आणि कारणे सार्वजनिक करण्याचे आवाहन!‘नागरिकांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी महापालिका कटिबद्ध’; स्थायी समिती बैठकीत सभापती अभिषेक बारणे यांचे प्रतिपादन!‘शिक्षकांमुळेच महापालिका शाळांकडे पालकांचा कल वाढला’; प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान!‘शहराच्या नियोजनबद्ध विकासात पालिकेच्या अभियंत्यांचे योगदान अद्वितीय’; महापौर रवी लांडगे यांचे प्रतिपादन!‘अभिजात मराठी भाषा सप्ताह ही लोकचळवळ व्हावी’; पिंपरी महापालिकेच्या नियोजन बैठकीत महापौर रवी लांडगे यांचे प्रतिपादन!
Home पिंपरी चिंचवड ‘नागरिकांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी महापालिका कटिबद्ध’; स्थायी समिती बैठकीत सभापती अभिषेक बारणे यांचे प्रतिपादन!

‘नागरिकांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी महापालिका कटिबद्ध’; स्थायी समिती बैठकीत सभापती अभिषेक बारणे यांचे प्रतिपादन!

वाकडमध्ये पीएमपीएमएल डेपो, महिला वसतिगृह अन् पाणीपुरवठ्याशी संबंधित कामांवर शिक्कामोर्तब | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पाणीपुरवठा, जलनिःसारण, दिव्यांग भवन, बस डेपो व नागरी सुविधांशी संबंधित विविध विकासकामांना स्थायी समितीची मंजुरी!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. १६ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासाशी व नागरिकांच्या दैनंदिन सोयी-सुविधांशी निगडित विविध महत्त्वाच्या प्रस्तावांवर चर्चा करून स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी मंजुरी दिली. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात आयोजित करण्यात आलेल्या स्थायी समितीच्या साप्ताहिक बैठकीत हे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
या बैठकीस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जंगम, विक्रान्त बगाडे, तृप्ती सांडभोर यांच्यासह स्थायी समितीचे सर्व सदस्य आणि विविध विभागांचे प्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मोरवाडी येथील सुमारे २४ हजार चौ. फूट क्षेत्रातील दिव्यांग भवनात थेरपी, समुपदेशन, फिजिओथेरपी, हायड्रोथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, कौशल्य मार्गदर्शन केंद्र, ऑडिटोरियम आणि लायब्ररी सुविधा उपलब्ध करून देण्यासह त्याच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी संचालक मंडळाच्या रचनेला मंजुरी देण्यात आली. तसेच महापालिका हद्दीतील दिव्यांग व्यक्तींना मोफत बस पास देणे आणि ६० वर्षांवरील अंध व्यक्तींच्या सोबतीदारांना बस प्रवासाचा पास देण्याच्या खर्चास मान्यता दिली. नवी सांगवी परिसरात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास मंजुरी देण्यात आली. याशिवाय, शहरातील जलनिःसारण नलिकांची (ड्रेनेज लाईन) अत्याधुनिक पद्धतीने देखभाल व दुरुस्ती करण्याच्या कामास हिरवा कंदील दाखवण्यात आला.  मौजे वाकड येथे पीएमपीएमएल (PMPML) बस डेपो, कार्यालयीन इमारत विकसित करणे आणि ई-बसेससाठी आवश्यक चार्जिंग स्टेशन प्रणाली उभारण्यासाठी उच्चदाब भूमिगत विद्युत वाहिनी व वीजपुरवठ्याच्या कामांना मंजुरी दिली. वाकड (प्रभाग २५) येथे नोकरदार महिलांसाठी वसतिगृह बांधण्याच्या कामाच्या जमा-खर्च खात्यात सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच ‘स्वच्छ महाराष्ट्र भारत अभियान’ अंतर्गत ‘क’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत महिला बचत गटांमार्फत ‘शून्य कचरा’ (Zero Waste) प्रकल्प राबविण्यास मुदतवाढ व मंजुरी दिली.  काळेवाडी (प्रभाग २२) व चिंचवड (प्रभाग १८) मधील रस्त्यांच्या दुरुस्तीच्या निविदा करारांना मंजुरी देण्यात आली. तसेच चऱ्होली (प्रभाग ३) येथील नव्याने तयार रस्त्यांवर स्ट्रीट लाईट सुरू करण्यासाठी नवीन वीजमीटर व वीजपुरवठ्यास मान्यता दिली. प्राथमिक शाळांमधील सीसीसीटीव्ही (CCTV) यंत्रणेच्या वार्षिक देखभाल-दुरुस्तीस मंजुरी देण्यात आली. ‘बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियाना‘ंतर्गत शाळांमध्ये प्रयोगशाळा व वाचनालय विकसित करणे, जिम उपकरणे आणि रुग्णालयांसाठी वैद्यकीय उपकरणे खरेदीचा समावेश करण्यात आला. महापालिकेच्या पशुवैद्यकीय रुग्णालये, ॲम्ब्युलन्स, डॉग व्हॅन आणि डॉग पार्कसाठी आवश्यक मनुष्यबळ पुरवण्यासाठी एजन्सी नियुक्तीस मंजुरी. प्रशासकीय कामकाजासाठी व आगामी निवडणुकीसाठी झेरॉक्स प्रती काढण्याचा दरकरार निश्चित करण्यात आला. निवृत्त कर्मचारी व पेन्शन प्रकरणे निकाली काढण्यासाठी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची मानधनावर नियुक्ती आणि ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२५‘ अंतर्गत जनजागृतीसाठी भिंतींवर चित्रे व घोषवाक्ये रंगवण्याच्या कामांना मंजुरी देण्यात आली.

 

“पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना अधिक सक्षम, दर्जेदार आणि वेळेत नागरी सुविधा उपलब्ध करून देणे ही महापालिकेची प्रमुख जबाबदारी आहे. आजच्या बैठकीत पाणीपुरवठा, जलनिःसारण, दिव्यांग कल्याण, सार्वजनिक वाहतूक, महिला सुविधा, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांशी संबंधित महत्त्वपूर्ण प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. या सर्व निर्णयांची वेळेत व प्रभावी अंमलबजावणी करून त्याचा थेट लाभ नागरिकांना मिळवून देण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने कार्यवाही करावी. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी स्थायी समिती सदैव लोकाभिमुख निर्णय घेण्यास कटिबद्ध आहे.”
— अभिषेक बारणे (सभापती, स्थायी समिती, पिंपरी-चिंचवड महापालिका)
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!