29
शेलपिंपळगाव येथील घरफोडीचा गुन्हा उघडकीस; २ लाखांच्या रोकडसह एका आरोपीला ‘युनिट-३’ कडून अटक!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १४ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी / चाकण: शेलपिंपळगाव (ता. खेड) येथील बंद घराचा कडी-कोयंडा तोडून बेडरूममधील कपाटातील सोन्याचे दागिने लांबवणाऱ्या घरफोड्यांचा पर्दाफाश करण्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-३ ला यश आले आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून चोरीच्या वाटणीतील २ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. फिलीप नादर चव्हाण (वय ३३, रा. चिचोंडी पाटील, ता. जि. अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे, तर त्याचा साथीदार छगन चिंतामण काळे (रा. कडा, ता. आष्टी, जि. बीड) याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. २४ जुलै २०२६ रोजी सकाळी ११:३० ते दुपारी २:३० च्या सुमारास ढासे वस्ती (मोहितेवाडी, शेलपिंपळगाव, ता. खेड) येथील रहिवासी अमोल एकनाथ पोतले (वय ३२) यांचे घर बंद असताना अज्ञात चोराने मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला होता. कपाटातील लॉकर उघडून सोन्याचे मौल्यवान दागिने चोरून नेल्याप्रकरणी चाकण (दक्षिण) पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३३१(३) व ३०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे व त्यांच्या पथकाने परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेजची तपासणी सुरू केली. दरम्यान, पोलीस हवालदार सोनवणे यांना गुप्त बातमीदारामार्फत हा गुन्हा फिलीप चव्हाण व छगन काळे यांनी केल्याची पक्की माहिती मिळाली.
माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने तातडीने अहिल्यानगर जिल्ह्यातील चिचोंडी पाटील येथे धाड टाकून फिलीप चव्हाण याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने आपल्या साथीदारासह चाकण मोहितेवाडी येथे घरफोडी केल्याची कबुली दिली.
चोरी केलेल्या मालाबाबत विचारपूस केली असता, साथीदार छगन काळे याने दागिन्यांच्या मोबदल्यात त्याला २ लाख रुपये दिल्याचे त्याने सांगितले. आरोपी फिलीप याच्याकडून ही २,००,०००/- रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चाकण (दक्षिण) पोलीस करत आहेत.
ही कारवाई पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) रोहीदास पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. सुदर्शन राठोड आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रशासन) सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे, पोलीस उप-निरीक्षक भरत गोसावी, सुनील जावळे, पोलीस अंमलदार सोनवणे, भोसुरे, इचके, साबळे, खेडकर, गुंजाळ, राळे, दांगट व थोरात यांनी केली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
