29
अवघ्या २ हजार रुपयांसाठी खून करून मृतदेह तलावात फेकणारा अट्टल आरोपी दिल्लीतून गजाआड; पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेकडून गुन्हा उघडकीस!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. १६ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी / बावधन: अवघ्या दोन हजार रुपयांच्या कारणावरून एका इसमाचा निर्घृण खून करून, पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे हात-पाय बांधून व पायाला मोठा दगड बांधून तलावात फेकून देणाऱ्या मुख्य आरोपीला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-२ आणि गुंडा विरोधी पथकाने दिल्लीतून शिताफीने ताब्यात घेतले आहे. गोपाल ऊर्फ राज साधोन बिस्वास (वय २०, सध्या रा. मुर्गा मंडी समोरील ब्रिजखाली, गाझीपूर, दिल्ली; मूळ रा. बीचीपुली, ता. बारासात, जि. उत्तर २४ परगना, पश्चिम बंगाल) असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे.
पोलीस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, दुधाळे वस्ती (ता. मुळशी, जि. पुणे) येथून दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी एक इसम घरातून बाहेर गेला तो परत आलाच नाही. या प्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात अपहरण (BNS कलम १३७(२)) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी दुधाळे वस्ती येथील तलावात या मिसिंग इसमाचा मृतदेह आढळून आला. आरोपींनी त्या इसमास जबर मारहाण करून, हात-पाय बांधून खून केला होता आणि पुरावा नष्ट करण्यासाठी पायाला दगड बांधून बॉडी तलावातील पाण्यात फेकून दिली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी गुन्हे शाखेला समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.
घटनास्थळ ग्रामीण भागात असल्याने तिथे कोणतेही सी.सी.टी.व्ही. फुटेज उपलब्ध नव्हते. पिरंगुट येथील बाजार आणि दारूच्या दुकानांचे फुटेज तपासूनही सुरुवातीला कोणताही सुगावा लागला नाही. त्यानंतर गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण सुरू केले असता, सदर खून गाझीपूर (दिल्ली) येथील दोन मजुरांनी दारूच्या वादातून व दोन हजार रुपयांसाठी केला असून ते दिल्लीला पसार झाल्याची गोपनीय माहिती मिळाली.
माहिती मिळताच पोलीस उप-निरीक्षक मयुरेश साळुंखे, सहाय्यक पोलीस उप-निरीक्षक गणेश मेदगे, पोलीस हवालदार विजय गंभीरे व पोलीस शिपाही प्रशांत सैद यांचे पथक तातडीने दिल्लीला रवाना झाले.
आरोपी दिल्लीत कचरा वेचण्याचे व मजुरीचे काम करत असल्याने त्यांचा कोणताही ठराविक पत्ता किंवा फोन नंबर नव्हता. तरीही पथकाने सलग तीन दिवस पारंपरिक पद्धतीने आणि गोपनीय माहितीच्या आधारे शोध घेत गाझीपूर येथील मुर्गा मंडी परिसराच्या पुलाखालून मुख्य आरोपी गोपाल ऊर्फ राज याला बेड्या ठोकल्या.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप सावंत व गुंडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली यांच्या नेतृत्वाखालील पथकाने फत्ते केली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
