29
रहाटणी-तापकीर नगर परिसरातील पाणीप्रश्नावर नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची ‘ऑन फिल्ड’ पाहणी!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. १६ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी / रहाटणी: रहाटणी-तापकीर नगर प्रभागातील सौंदर्य कॉलनी, साईज्योत कॉलनी, बळीराज कॉलनी, सिंहगड कॉलनी, राजगड कॉलनी आणि शिवराज नगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून भेडसावणाऱ्या कमी दाबाच्या व अनियमित पाणीपुरवठ्याच्या समस्यांवर अखेर प्रशासनाकडून थेट जागेवर जाऊन पावले उचलण्यात आली आहेत. नगरसेवक तथा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे सदस्य बाबासाहेब ज्ञानोबा त्रिभुवन यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन ‘ऑन फिल्ड’ पाहणी करत स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधला. कार्यसम्राट आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली हा पाठपुरावा केला जात असून, नागरिकांना भेडसावणारी पिण्याच्या पाण्याची समस्या मुळापासून सोडवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
पाहणीदरम्यान नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी नागरिकांच्या नळाला येणाऱ्या पाण्याचा प्रत्यक्ष दाब, पाणीपुरवठ्याची वेळ आणि दैनंदिन अडचणी जाणून घेतल्या. यानंतर त्यांनी थेट ‘ड’ प्रभागातील पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य टाकीची पाहणी केली. या प्रसंगी उपस्थित असलेल्या महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून संपूर्ण पाणी वितरणाच्या व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

परिसरातील नागरिकांना पुरेशा दाबाने आणि दररोज निश्चित वेळेत नियमित पाणी मिळावे, यासाठी पाणीपुरवठा विभागाने तातडीने तांत्रिक अडचणी दूर करून आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात, अशा सक्त सूचना नगरसेवक त्रिभुवन यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
“नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेवर मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. रहाटणी आणि तापकीर नगर परिसरातील पाणीप्रश्न लवकरात लवकर कायमस्वरूपी सुटेल, यासाठी पालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.”— बाबासाहेब ज्ञानोबा त्रिभुवन, नगरसेवक व permanent समिती सदस्य, पीसीएमसी.
या पाहणी दौऱ्यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिका पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक करपे, कनिष्ठ अभियंता समीक्षा मालपुरे, अंकुश सईजराव यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे संबंधित कर्मचारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
