30
दिव्यांग भवन फाउंडेशनच्या द्विवार्षिक विशेषांकाचे महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते प्रकाशन!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १६ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: “पिंपरी-चिंचवड शहरात दिव्यांगांसाठी ‘दिव्यांग भवन’ हे एकाच छताखाली सर्व प्रकारच्या थेरपी, वैद्यकीय उपचार आणि पुनर्वसन सुविधा देणारे हक्काचे व विश्वासाचे ठिकाण ठरले आहे. महापालिकेच्या वतीने दिव्यांगांना ताकद व बळ देण्यासाठी दिव्यांग भवनच्या माध्यमातून निरंतर प्रयत्न सुरू आहेत. या अत्यंत सेवाभावी कार्यासाठी महापालिकेकडून आवश्यक ती सर्व मदत व सहकार्य करण्यास मी सदैव तत्पर आहे,” असे प्रतिपादन महापौर रवी लांडगे यांनी केले.
दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सक्षमीकरणासाठी कटिबद्ध असलेल्या ‘दिव्यांग भवन फाउंडेशन’च्या वतीने तयार करण्यात आलेल्या द्विवार्षिक विशेषांकाचे प्रकाशन महापौर रवी लांडगे यांच्या शुभहस्ते दिव्यांग भवन (पिंपरी) येथे पार पडले. या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

या सोहळ्यास मुख्य उपस्थित असलेले आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, “दिव्यांग भवन हे केवळ सेवा पुरवणारे केंद्र नसून दिव्यांगांच्या विचारांना, कलागुणांना आणि आकांक्षांना योग्य दिशा देणारे सशक्त व्यासपीठ आहे. दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी दिव्यांग भवनचे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे हे मॉडेल राज्यातील इतर सर्व महानगरपालिकांसाठी अत्यंत मार्गदर्शक आणि अनुकरणीय ठरेल.”
दिव्यांग भवनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख यांनी या वेळी आभार व्यक्त करताना सांगितले की, “या द्विवार्षिक विशेषांकासाठी राज्याचे मा. मुख्यमंत्री, दिव्यांग कल्याण विभागाचे मंत्री आणि राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडून मिळालेले शुभेच्छा संदेश हे दिव्यांग भवनच्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेणारे आणि संपूर्ण टीमच्या पाठीवर कौतुकाची थाप देणारे आहेत. हे संदेश भविष्यात अधिक व्यापक कार्य करण्यासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरतील.”
या दिमाखदार सोहळ्यास महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विक्रान्त बगाडे, व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख, सहाय्यक आयुक्त निवेदिता घार्गे, व्यवस्थापक परेश गांधी, मानसशास्त्रज्ञ अपर्णा चव्हाण यांच्यासह दिव्यांग बांधव, शिक्षक आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

