जुनी सांगवीतील ‘यश ज्येष्ठ नागरिक संघा’त अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याचा जागर; विज्ञानातील चमत्कारांचे प्रात्यक्षिकांसह सादरीकरण!
सांगवी/पिंपरी, प्रतिनिधी बालाजी नवले दि. ३ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: यश ज्येष्ठ नागरिक संघ, चंद्रमानीनगर (जुनी सांगवी) येथे ३१ जुलै रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) कार्याची माहिती जाणून घेण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांना अंधश्रद्धा, बुवाबाजी आणि भोंदूगिरीमागील शास्त्रीय सत्य प्रात्यक्षिकांसह समजावून सांगण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुंडलिक जाधव सर होते. तर मुख्य अतिथी म्हणून माजी नगरसेवक व संघाचे संस्थापक संतोष कांबळे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘अ’ प्रभागाच्या नवनिर्वाचित अध्यक्षा व नगरसेविका तृप्ती कांबळे, ‘अंनिस’चे ज्येष्ठ कार्यकर्ते मिलिंद देशमुख आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील पोकरे उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘अ’ प्रभाग अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल नगरसेविका तृप्ती कांबळे यांचा संघाच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. आपल्या मनोगतात त्यांनी ज्येष्ठ नागरिकांचे सर्व प्रलंबित प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले.
तसेच, माजी नगरसेवक संतोष कांबळे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा दाखला देत, “अंधश्रद्धा हे अज्ञान आणि गुलामगिरीचे लक्षण आहे,” असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाची सुरुवात जुलै महिन्यात जन्मदिवस असलेल्या संघातील सुमारे १० ते १२ ज्येष्ठ सदस्यांचा वाढदिवस साजरा करून करण्यात आली. सर्व वाढदिवस असलेल्या सदस्यांना गुलाबपुष्प व पेन देऊन गौरविण्यात आले व केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
‘अंनिस’चे राज्य कार्यकारी सदस्य मिलिंद देशमुख यांचा परिचय सामाजिक कार्यकर्ते सुनील पोकरे यांनी करून दिला. गेली ३० वर्षे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कार्यरत असलेल्या मिलिंद देशमुख यांनी समाजात भोंदूगिरी आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली होणारी फसवणूक कशी रोखावी, यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
त्यांनी तेलाशिवाय दिवा पेटवणे आणि पाठीवर ब्रशचा स्पर्श करून गुप्त अंक वाचणे यांसारख्या तथाकथित चमत्कारांमागील वैज्ञानिक तथ्ये प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून साध्या, सोप्या भाषेत उलगडून दाखवली. उपस्थितांनी या प्रयोगांना भरभरून दाद दिली. तसेच ज्येष्ठ नागरिकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची निरसनकारक उत्तरेही त्यांनी दिली.
कार्यक्रमादरम्यान ‘अंनिस’चे कार्यकर्ते पेंडसे काका व नलावडे काका यांच्या वतीने ग्रंथदिंडी, विविध वैचारिक पुस्तके आणि मासिकांचे आकर्षक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत बाराते यांनी केले. सूत्रसंचालन कार्याध्यक्ष सूर्यकांत वराडकर यांनी केले, तर आभार अध्यक्ष चंद्रकांत बाराते यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघाचे सचिव बाळासाहेब सोनावणे व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या सोहळ्याला परिसरातील ६० ते ७० ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

