news
Home पिंपरी चिंचवड २० वर्षे उलटूनही विकसन करारातील दुकान अन् फ्लॅट नाहीच; दापोडी पोलिसांत तक्रार देऊनही कारवाई न झाल्याने संताप

२० वर्षे उलटूनही विकसन करारातील दुकान अन् फ्लॅट नाहीच; दापोडी पोलिसांत तक्रार देऊनही कारवाई न झाल्याने संताप

कॉलर पकडून जीवे मारण्याची धमकी दिल्याने खळबळ; फसवणूक करणाऱ्या विकासकांवर पिंपरी पालिकेने कडक नियमावली आणण्याची मागणी | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

कौटुंबिक जमिनीच्या व्यवहारात फसवणूक करून धमक्या देणाऱ्या बांधकाम व्यावसायिक कुणाल चोरडियावर तातडीने गुन्हा दाखल करा: विनोद धुमाळ यांची मागणी!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. ३ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड: भोसरी येथील कौटुंबिक मिळकतीच्या विकासाच्या व्यवहारात ‘विशाल चोरडिया कन्स्ट्रक्शन प्रा. लि.’चे डायरेक्टर कुणाल दिलीप चोरडिया यांनी कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक, विश्वासघात आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा खळबळजनक आरोप विनोद अनंता धुमाळ यांनी केला आहे. पिंपरी येथील हॉटेल नमस्कार येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केला. तसेच आरोपी कुणाल चोरडियाविरोधात दापोडी पोलीस ठाण्यात तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी केली.

विनोद धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी येथील कौटुंबिक जमिनीच्या विकासाबाबत दिलीप मोतीलाल चोरडिया, मुलगा कुणाल दिलीप चोरडिया आणि मध्यस्थ प्रफुल्ल इनामदार यांच्याशी चर्चा झाली होती.

त्यानंतर दि. २२/१२/२००६ रोजी दुय्यम निबंधक कार्यालय हवेली नं. १७ मध्ये कायदेशीर विकसन करारनामा (दस्त क्र. १०३९६/२००६) व कुलमुखत्यारपत्र (दस्त क्र. १०३९७/२००६) नोंदवण्यात आले. या करारांनुसार मिळकतीच्या बदल्यात व्यावसायिक बांधकामातील तळ मजल्यावर एक दुकान आणि ६५० चौ. फुटाचा एक फ्लॅट चार वर्षांच्या आत देण्याचे लिखित आश्वासन कुणाल चोरडिया यांनी दिले होते.

परंतु, या आश्वासनावर विश्वास ठेवून जमिनीचा ताबा देऊन तब्बल २० वर्षे (दोन दशके) उलटली तरी अद्याप कोणतेही बांधकाम सुरू झाले नाही आणि दिलेल्या कराराची पूर्तता करण्यात आली नाही.

वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही केवळ आश्वासनेच मिळाली. शेवटी हक्काचा मोबदला किंवा जमीन परत मागितली असता कुणाल चोरडिया आणि प्रफुल्ल इनामदार यांनी गुंडगिरीची भाषा वापरत धमकावण्यास सुरुवात केली.

“कुणाल चोरडियाने माझी शर्टाची कॉलर पकडून शिवीगाळ केली आणि ‘आमच्याकडे खूप पैसा आहे, आम्ही कोणालाही विकत घेऊ शकतो. जास्त नाटक केलेस तर तुला कुठे मारून गायब करू हे तुझ्या घरच्यांना कळणारही नाही. आमची मोठ्या गुंडांशी उठबस आहे, तू कुठल्याही पोलिसांकडे जा, आमचे काही वाकडे करू शकणार नाही,’ अशी थेट जीवे मारण्याची धमकी दिली.”

विनोद धुमाळ (बाधित नागरिक)

या गंभीर प्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार अर्ज दाखल करूनही अद्याप पोलिसांनी ठोस कारवाई केलेली नाही. सामान्य नागरिकांची फसवणूक झाल्यावर त्यांना न्यायासाठी पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवावे लागत असतील, तर ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांत बांधकाम व्यावसायिकांकडून मूळ जमीन मालकांची आणि सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने (PCMC) आणि पोलीस प्रशासनाने अशा फसवणूक करणाऱ्या व गुंडगिरी करणाऱ्या विकासकांवर कडक नियमावली आणून स्वतः लक्ष घालणे गरजेचे आहे, जेणेकरून भविष्यात इतर कोणत्याही नागरिकाची अशी फसवणूक होणार नाही.

“माझी कोणाशीही वैयक्तिक वैरभावना नसून केवळ माझ्या कुटुंबाची झालेली फसवणूक थांबवून आम्हाला आमचा हक्क व न्याय मिळावा, एवढीच अपेक्षा आहे,” असे धुमाळ म्हणाले. या प्रकरणात पोलिसांकडून तातडीने गुन्हा दाखल झाला नाही, तर वरिष्ठ पोलीस अधिकारी, जिल्हाधिकारी, गृहविभाग आणि राज्य शासनाकडे दाद मागून लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी शेवटी दिला.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!