पालखी सोहळ्याच्या परतीच्या प्रवासातही वृक्षमित्र अरुण पवार यांच्या माणुसकीचा झरा; वारकऱ्यांसाठी मोफत पिण्याच्या पाण्याचे ७ टँकर रवाना!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ३ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या आषाढी वारीच्या परतीच्या प्रवासातही वारकऱ्यांची तहान भागवण्यासाठी वृक्षमित्र अरुण पवार यांनी आपल्या माणुसकीचा झरा पुन्हा एकदा प्रवाहित ठेवला आहे. पंढरपूर ते आळंदी या संपूर्ण परतीच्या पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी त्यांच्या वतीने मोफत शुद्ध पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त निघणाऱ्या या पवित्र पालखी सोहळ्यात ऊन, वारा आणि पावसाची कोणतीही तमा न बाळगता लाखो वारकरी पांडुरंगाच्या भेटीसाठी पायी प्रवास करतात. या प्रवासादरम्यान विशेषतः पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई व गैरसोय निर्माण होते. वारकऱ्यांची हीच अडचण ओळखून वृक्षमित्र अरुण पवार हे गेल्या १२ वर्षांपासून आषाढी वारीत मोफत पिण्याच्या शुद्ध पाण्याचे टँकर पाठवून वारकऱ्यांची भूतदया आणि निष्ठेने सेवा करत आहेत.
यंदाच्या पालखी सोहळ्यातही अरुण पवार यांच्या वतीने पाण्याचे सात भव्य टँकर वारकऱ्यांच्या सेवेत दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, पंढरपूर येथे आषाढी सोहळा पार पडल्यानंतर पालखीच्या परतीच्या प्रवासातही हे पाण्याचे टँकर आळंदीपर्यंत पालखी सोहळ्यासोबतच मार्गस्थ आहेत. त्यामुळे परतीच्या कठीण वाटेवरही वारकऱ्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार नाही. अरुण पवार यांच्या या अनोख्या व सातत्यपूर्ण सेवाभावी उपक्रमाचे वारकरी संप्रदायातून आणि संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरातून अत्यंत आदराने कौतुक होत आहे.
“वारकऱ्यांची सेवा हीच खरी पांडुरंगाची सेवा!”
“वारकऱ्यांच्या पायी वारीत सहभागी होऊन त्यांची सेवा करणे हीच माझ्यासाठी प्रत्यक्ष पांडुरंगाची पूजा आहे. माऊली आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या या अथांग पालखी सोहळ्यात सेवेचा एक खारीचा वाटा उचलता आला याचे मला आत्मिक समाधान आहे. पाण्याच्या मूलभूत गरजेसाठी एकाही वारकऱ्याचे हाल होऊ नयेत, हाच आमचा प्रामाणिक हेतू आहे.”
— वृक्षमित्र अरुण पवार
सामाजिक बांधीलकी जपत पर्यावरणासाठी ‘वृक्षमित्र’ म्हणून ख्याती मिळवलेले अरुण पवार हे वारकरी सेवेच्या माध्यमातून निस्वार्थ समाजकार्याचा वस्तूपाठ घालून देत आहेत. त्यांच्या या अखंड चालणाऱ्या सेवेमुळे वारकरी संप्रदायात त्यांच्याबद्दल अत्यंत आदराची आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त होत आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
