नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य; अतिधोकादायक इमारती व अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करा: आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. ३ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: शहरातील वाढते अतिक्रमण, पदपथांवरील (फूटपाथ) अडथळे, बेकायदेशीर व अनधिकृत बांधकामे, हॉकर्स व्यवस्थापन, बांधकाम परवानगी, पाणीपुरवठा व्यवस्था तसेच विविध विकास प्रकल्पांच्या गतीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली आज एक महत्त्वपूर्ण उच्चस्तरीय बैठक संपन्न झाली.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, अतिरिक्त आयुक्त विक्रम बगाडे, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, शहर अभियंता मनोज सेठिया, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, प्रेरणा सिंदकर, सुनील भागवानी, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे यांच्यासह सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि सर्व क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.
शहरात सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले. विशेषतः अतिधोकादायक इमारतींमुळे कोणतीही जीवितहानी होऊ नये, यासाठी अशा इमारतींच्या मिळकतधारकांना तात्काळ नोटिसा बजावून इमारती रिकाम्या करून घेण्याच्या आणि पुढील आवश्यक कायदेशीर कारवाई तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
नागरिक व पादचाऱ्यांच्या सोयीसाठी शहरातील फूटपाथवरील अतिक्रमणे तातडीने हटवून पादचाऱ्यांसाठी रस्ते मोकळे व सुरक्षित करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच हॉकर्स धोरणानुसार नियमानुसार कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
पावसाळ्यात विविध सखल भागात पाणी साचण्याच्या घटना घडतात, अशा वेळी प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ दखल घेऊन त्याच क्षणी घटनास्थळी कार्यवाही करावी. कोणत्याही परिस्थितीत नैसर्गिक नाल्यांचा मूळ प्रवाह बाधित होणार नाही आणि जलकोंडीमुळे कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, याची विशेष दक्षता सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
नागरिकांना कचरा विलगीकरण मोहिमेमध्ये सक्रिय सहभागी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. घरोघरी ओला कचरा व सुका कचरा वेगळा करण्यासाठी नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यात यावी. तसेच कचरा विलगीकरणासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांची माहिती आणि महत्त्व नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवावे, असे निर्देशही आयुक्तांनी प्रशासकीय यंत्रणांना दिले.
यासोबतच अनधिकृत बांधकामांवर प्रभावी कारवाई करणे, बांधकाम व अग्निशमन परवानग्यांची वेळेत व नियमानुसार पडताळणी करणे, शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेचे योग्य नियोजन करणे आणि विकास कामे निर्धारित वेळेत व गुणवत्तेसह पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी आपापसांत समन्वय ठेवून काम करावे, असे स्पष्ट आदेश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

