वाकड पोलिसांची धडक कामगिरी: दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारांना बेड्या; १५.५० लाख रुपयांच्या २५ मोटारसायकल जप्त, १७ गुन्हे उघडकीस!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ३ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी राबवलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत वाकड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने मोठी कामगिरी केली आहे. वाहने चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडून १५ लाख ५० हजार रुपये किमतीच्या तब्बल २५ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या धडक कारवाईमुळे वाकड, आळंदी, चाकण, महाळुंगे, संत तुकाराम नगर, शिक्रापूर आणि माणगाव (रायगड) पोलीस ठाण्यांमधील तब्बल १७ गुन्हे उघडकीस आले आहेत.
पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विजय कुमार चौबे यांनी शहरात दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ-२) प्रदीप जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी तपास पथकाला सूचना दिल्या होत्या.
तपास पथकाने घटनास्थळांच्या परिसरातील शेकडो सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. यादरम्यान पोलीस हवालदार चंदू मिरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ज्ञानेश्वर शंकरराव जैसवाल (वय ४६ वर्षे, धंदा-ड्रायव्हर, रा. आळंदी देवाची, पुणे) यास १ ऑगस्ट २०२६ रोजी ताब्यात घेण्यात आले. त्याची सखोल आणि कौशल्याने चौकशी केली असता, त्याने गेल्या दोन वर्षांत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय व लगतच्या परिसरातून अनेक दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले. आरोपीकडून २३ चोरलेल्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी ज्ञानेश्वर जैसवाल हा खाजगी गाड्यांवर बदली चालक (ऑल्टरनेट ड्रायव्हर) म्हणून काम करत असे. केवळ स्वतःच्या मौजमजेसाठी तो रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी चोरायचा. त्या वाहनातील पेट्रोल संपेपर्यंत किंवा मौज संपेपर्यंत गाडी वापरून ती कुठेही सोडून द्यायचा आणि त्यानंतर दुसरी गाडी चोरायचा, अशी त्याची गुन्हे करण्याची पद्धत तपासात उघड झाली आहे.
याच मोहिमेदरम्यान वाकड तपास पथकाने २ ऑगस्ट २०२६ रोजी कारवाई करत, वेदप्रकाश मदनसिंग रावत (वय ३५ वर्षे, रा. ताथवडे) यास अटक करून त्याच्याकडून वाकड पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील ०१ अॅक्टिव्हा मोपेड जप्त केली. संतोष मोहन सांगिलवाड (वय १८ वर्षे, रा. वेणुनगर, वाकड) यास अटक करून त्याच्याकडून ०१ ज्युपिटर मोपेड जप्त केली. आरोपींकडून जप्त केलेल्या २५ वाहनांपैकी खालील पोलीस ठाण्यांमधील १७ गुन्हे उघडकीस आले आहेत. वाकड पोलीस ठाणे: ४ गुन्हे, आळंदी पोलीस ठाणे: ७ गुन्हे, चाकण / महाळुंगे पोलीस ठाणे: ३ गुन्हे, संत तुकाराम नगर पोलीस ठाणे: १ गुन्हा, शिक्रापूर पोलीस ठाणे (पुणे ग्रामीण): १ गुन्हा, माणगाव पोलीस ठाणे (जि. रायगड): १ गुन्हा तसेच आरोपी ज्ञानेश्वर जैसवाल याच्याकडे मिळून आलेल्या इतर ५ दुचाकींच्या (हिरो स्प्लेंडर, हिरो ग्लॅमर, हिरो-होंडा एसएस, टीव्हीएस व्हिक्टर, बजाज प्लॅटिना, होंडा शाईन इत्यादी) मूळ मालकांशी संपर्क साधून पुढील तपास सुरू आहे.
ही उल्लेखिनीय कामगिरी पोलीस आयुक्त विजय कुमार चौबे, पोलीस सह-आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उप-आयुक्त प्रदीप जाधव, सह. पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे, सपोनि अंबरीश देशमुख, सपोनि श्रीनिवास दराडे, श्रेणी पोउपनि मारणे आणि अंमलदार दळे, चंदू मिरे, विजय भुसारे, मोहम्मद नदाफ, सचिन नायकवाडे, विजय घाडगे, दीपक साबळे, विजय मोरे, कीर्तिकुमार खराडे, ज्ञानदेव झेंडे, विक्रम भगत, समाधान कांबळे, प्रमोद गायके, अभिषेक मांडे, कारभारी पालवे व मंगेश लोखंडे यांनी केली आहे. मामल्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास दराडे करत आहेत.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
