MPSC, CET परीक्षा घोटाळे आणि पेपरफुटीविरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक; मुख्यमंत्र्यांना तहसीलदारांमार्फत मागण्यांचे निवेदन!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ३ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड : महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लावणाऱ्या एमपीएससी (MPSC) पेपरफुटी, एमएचटी-सीईटी (MHT-CET) परीक्षा महाघोटाळा, पर्सेंटाईल पद्धतीतील त्रुटी आणि टीईटी (TET) परीक्षेच्या नावाखाली शिक्षकांची होणारी पिळवणूक यांविरोधात संभाजी ब्रिगेडने एल्गार पुकारला आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज आखरे व सरचिटणीस सौरभ खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, शहराध्यक्ष प्रवीण कदम यांच्या नेतृत्वात मा. मुख्यमंत्र्यांच्या नावे तहसीलदारांना ५ ऑगस्ट २०२६ रोजी एक विस्तृत निवेदन देण्यात आले.
राज्यातील ग्रामीण, गुणवंत व कष्टकरी विद्यार्थ्यांवर होत असलेला अन्याय दूर करून शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी संभाजी ब्रिगेडने या निवेदनाद्वारे शासनाकडे थेट ६ प्रमुख मागण्या मांडल्या आहेत.
निवेदनात नमूद केल्यानुसार, मागील अनेक दिवसांपासून एमपीएससी, सीईटी, नीट (NEET) आणि औषध निर्माणशास्त्र अशा विविध परीक्षांचे पेपर फुटत असून त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. ग्रामीण व शहरी भागातील गरीब कुटुंबातील मुले-मुली पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर यांसारख्या शहरांत रात्रंदिवस मेहनत करून अभ्यास करतात. परंतु पेपरफुटीमुळे त्यांची वर्षानुवर्षांची मेहनत आणि पालकांचे कोट्यवधी रुपये वाया जात आहेत.
या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रवीण कदम म्हणाले की, “परीक्षेतील या घोटाळ्यांमुळे आणि अनिश्चिततेमुळे पालकवर्गात भीतीचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरून लढा देण्यास कटिबद्ध आहे.”
मार्च २०२६ मध्ये लोकसेवा आयोगाने घेतलेल्या औषध निरीक्षक (Drug Inspector) पदाच्या परीक्षेतील जवळपास ९० प्रश्न आणि पर्याय परीक्षेच्या दोन दिवस आधीच लीक होऊन लाखांत विकले गेले. या गंभीर प्रकरणाची मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे आणि दोषींवर कडक कारवाई करावी. एमएचटी-सीईटी परीक्षेतील घोटाळा आणि गुण वाढवण्यासाठी लाखांची लाच मागितल्याच्या व्हायरल ऑडिओ क्लिप्सची निष्पक्ष चौकशी व्हावी. परीक्षेचे संपूर्ण नियोजन करणाऱ्या खाजगी आस्थापनेचे कंत्राट रद्द करून शासनाने ही प्रक्रिया स्वतःच्या नियंत्रणात घ्यावी, तसेच सर्व ऑनलाईन परीक्षा कायमच्या रद्द करून ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात याव्यात. गेल्या २४-२५ वर्षांपासून अध्यापनाचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना टीईटी सक्तीची करून त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण केला जात आहे. केरळ राज्याप्रमाणे महाराष्ट्रानेही ही जाचक अट रद्द करून शिक्षकांना दिलासा द्यावा. राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला केजी ते पीजी (KG to PG) पर्यंतचे दर्जेदार शिक्षण सक्तीचे आणि मोफत उपलब्ध करून देण्यात यावे. युपीएससी (UPSC) सारख्या सर्वोच्च परीक्षेला बगल देऊन नोकरशाहीत सुरू केलेली ‘लॅटरल एन्ट्री’ची अप्रत्यक्ष घुसखोरी तात्काळ थांबवण्यात यावी. एनसीईआरटीच्या (NCERT) पाठ्यपुस्तकातून छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आणि मराठा साम्राज्याचा नकाशा काढण्याचा जो प्रकार झाला आहे, तो इतिहास व नकाशा पाठ्यपुस्तकात सन्मानाने पूर्ववत समाविष्ट करण्यात यावा.
विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या न्यायासाठी संभाजी ब्रिगेडने उचललेले हे पाऊल अत्यंत कौतुकास्पद मानले जात आहे. जर शासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आणि दोषींवर कठोर कारवाई केली नाही, तर राज्यभर यापेक्षाही अधिक तीव्र व आक्रमक आंदोलन छेडले जाईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे.
या प्रसंगी संभाजी ब्रिगेडचे उपनेते सतीश काळे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष प्रवीण कदम, कार्याध्यक्ष वैभव जाधव, उपाध्यक्ष नारायण बिरादार, वैभव गजधने, कोषाध्यक्ष राजेश सातपुते, संघटक परशुराम रोडे, विवेक गायकवाड, श्याम पाटील यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
