news
Home अमरावती ५ सप्टेंबर: शिक्षक दिन कोणाचा? डॉ. राधाकृष्णन की महात्मा फुले?

५ सप्टेंबर: शिक्षक दिन कोणाचा? डॉ. राधाकृष्णन की महात्मा फुले?

बहुजन समाजाने मांडला नवा विचार; 'शिकणा-या'ला मान की 'शिकवणारा'ला? (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

जयकुमार चर्जन यांच्या लेखणीतून त्यांनी बहुजनांचे विचार मांडण्याचा प्रयत्न केला शिक्षक दिनानिमित्त मोठी चर्चा: डॉ. राधाकृष्णन की महात्मा फुले?

 

५ सप्टेंबर रोजी साजरा होणाऱ्या शिक्षक दिनावर प्रश्नचिन्ह; बहुजन समाजाकडून फुले दाम्पत्याला मान देण्याची मागणी

 

०५ सप्टेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

अमरावती : संपूर्ण देशभरात ५ सप्टेंबर हा दिवस भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो. परंतु, भारतीय इतिहासाचे पुनर्लेखन करण्याची मागणी जोर धरत असताना, ‘शिक्षक दिना’च्या खऱ्या मानकरी कोण आहेत, यावरही चर्चा सुरू झाली आहे. बहुजन समाजामधील काही विचारवंतांनी क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हेच या सन्मानाचे खरे मानकरी असल्याचा विचार मांडला आहे.

 

फुले दाम्पत्य: शिक्षण क्रांतीचे खरे जनक

या विचारानुसार, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनीच देशातील अज्ञानी समाजाला ज्ञानी करण्याचे ऐतिहासिक कार्य केले. त्यांनी कोणत्याही मोबदल्याशिवाय, उलट स्वतःच्या पदरमोड करून शाळा चालविल्या. स्वातंत्र्यपूर्व काळात, स्त्री आणि शूद्रातिशूद्रांना शिक्षण नाकारले जात असताना, त्यांनी सन १८४८ मध्ये पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. सावित्रीबाई फुले यांनी प्रस्थापित व्यवस्थेचा रोष पत्करत, शेण आणि दगडफेकीचा सामना करूनही स्त्री शिक्षणाची ज्योत पेटती ठेवली.

महात्मा फुले यांनी फक्त शाळा सुरू केल्या नाहीत, तर शिक्षणाचा पाया रचला. त्यांनी १८८२ मध्ये हंटर आयोगासमोर बहुजन समाजातील मुलांना १२ व्या वर्षापर्यंत प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करण्याची मागणी केली होती. त्यांनी स्पष्ट केले की, सरकारला मिळणारा महसूल बहुजनांकडून येतो, पण शिक्षण मात्र उच्चवर्णीयांना दिले जाते. या अन्यायावर त्यांनी कठोर शब्दांत हल्ला चढवला.

 

डॉ. राधाकृष्णन यांच्या योगदानावरील वाद

याउलट, डॉ. राधाकृष्णन यांच्या योगदानावर काही मुद्द्यांवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यांच्या साहित्याने बहुजन समाजाला गुलामगिरीत ढकलले आणि एका विशिष्ट वर्गाचे समर्थन केले, असा आरोप काही लेखकांनी केला आहे. तसेच, त्यांच्यावर जदुनाथ सिन्हा नावाच्या विद्यार्थ्याच्या प्रबंधातून साहित्य चोरून ‘इंडियन फिलॉसॉफी’ हा ग्रंथ स्वतःच्या नावाने प्रकाशित केल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी न्यायालयात दावा दाखल करण्यात आला होता, परंतु राष्ट्रपती पदाची प्रतिष्ठा जपण्यासाठी हा वाद नंतर मिटवण्यात आल्याचे म्हटले जाते. अशा व्यक्तीच्या जन्मदिनी ‘शिक्षक दिन’ साजरा करणे म्हणजे शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांशी प्रतारणा केल्यासारखे आहे, असेही काही विचारवंतांचे मत आहे.

 

फुले दाम्पत्याच्या कार्याचे व्यापक स्वरूप

महात्मा फुले यांनी केवळ शैक्षणिकच नव्हे, तर सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही मोठे योगदान दिले. ते आधुनिक काळातील आद्य नाटककारही मानले जातात. त्यांनी लिहिलेले साहित्य कोणत्याही पुरस्कारासाठी नसून, बहुजन समाजाला सन्मान मिळवून देण्यासाठी होते. शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा आहे, असे मानणाऱ्या महात्मा फुल्यांनी सर्वांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडून समाजाचा तिसरा डोळा उघडला.

सावित्रीबाई फुले यांनी आपल्या पतीला साथ देत केवळ एका वर्षात २० शाळा सुरू केल्या. त्यांनी शेतकऱ्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या कैफियती इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया यांच्या दरबारासमोर मांडल्या. शिक्षणामुळेच स्त्रिया सक्षम होऊ शकतात, हे ओळखून त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत समाजसुधारणेचा लढा कायम ठेवला.

आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने, ज्यांनी खऱ्या अर्थाने शिक्षणाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवले त्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना कोटी कोटी वंदन.

© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!