पिंपरी-चिंचवड ‘झोपडपट्टीविरहित शहर’ बनवणार! आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते १९४५ घरांची संगणकीय सोडत
डूडूळगाव येथील ११९० आणि किवळे येथील ७५५ सदनिकांची सोडत जाहीर; परवडणारी घरे देण्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्रेसर
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि.१५ डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड शहरातील सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्रेसर आहे. केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकार्यातून शहरातील प्रत्येक गरजू व बेघरांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन आमदार शंकर जगताप यांनी केले. शहरातील नागरिकांचे ‘हक्काच्या घराचे स्वप्न’ पूर्ण करण्यासाठी तसेच ‘झोपडपट्टीविरहित शहर’ बनवण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे प्रधानमंत्री आवास योजनेतील सदनिकांची संगणकीय सोडत काढण्यात आली, त्यावेळी आमदार शंकर जगताप बोलत होते.
-
डूडूळगाव प्रकल्प: प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत डूडूळगाव येथे उभारलेल्या प्रकल्पातील १ हजार १९० सदनिका.
-
किवळे प्रकल्प: आर्थिक दुर्बल घटकांसाठी किवळे येथील प्रकल्पातील ७५५ सदनिका.
एकूण १ हजार ९४५ सदनिकांची ही संगणकीय सोडत आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते जाहीर करण्यात आली. सोडतीमध्ये निवड झालेल्या नागरिकांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.
आमदार शंकर जगताप यांनी यावेळी विजेत्या सदनिका लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात पत्रांचे वाटप केले. ते पुढे म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहर हे देशात सातव्या आणि राज्यात पहिल्या क्रमांकाचे राहण्यायोग्य शहर म्हणून नावारूपास आले आहे. नागरिकांचे ‘हक्काच्या घराचे’ स्वप्न पूर्ण करण्याचे काम केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्यातून महापालिका पारदर्शक पद्धतीने करत आहे.
ज्या नागरिकांना आजच्या सोडतीत घर मिळाले नाही, त्यांनी निराश न होता ‘प्रधानमंत्री आवास योजना २.०’ साठी अर्ज करण्याचे आवाहन आमदार शंकर जगताप यांनी केले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त अण्णा बोदडे, सीओईपीचे विभागप्रमुख डॉ. सुधीर आगासे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे, माजी नगर सदस्य सागर आंघोळकर, सहाय्यक आयुक्त डी. डी. कांबळे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.
लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना:
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत डूडूळगाव येथील १ हजार १९० सदनिका तसेच किवळे येथील ७५५ सदनिकांच्या संगणकीय सोडतीमध्ये विजेते ठरलेल्या लाभार्थ्यांची यादी महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर नागरिकांना पाहण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
— अण्णा बोदडे, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी केले, तर उपायुक्त अण्णा बोदडे यांनी योजनेची सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले आणि आभार उपायुक्त अण्णा बोदडे यांनी मानले.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.



