‘सिंधुताईंचे स्वप्न पूर्ण करा, शिक्षण घेऊन मेळघाटातून कुपोषणाचा कलंक मिटवा’
माजी लेडी गव्हर्नर डॉ. कमलताई गवई यांचे आदिवासी विद्यार्थिनींशी भावनिक आवाहन
चिखलदरा – मेळघाटातील आदिवासी मुलींना शिक्षित करण्याचे पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांचे स्वप्न आता तुम्ही पूर्ण केले पाहिजे, असे आवाहन भारताचे सरन्यायाधीश श्री. भूषण गवई यांच्या मातोश्री तथा माजी लेडी गव्हर्नर डॉ. कमलताई गवई यांनी केले. चिखलदरा येथे एका वसतिगृहात आदिवासी मुलींशी संवाद साधताना त्यांनी मायेने आणि प्रेरणादायी शब्दात मार्गदर्शन केले.

‘स्वप्ने लहान नसतात, ती पूर्ण करण्याची ताकद आपल्यातच असते’
वनवासी गोपालकृष्ण बहुउद्देशीय मंडळ शहापूर द्वारा संचलित सावित्रीबाई फुले मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींशी बोलताना डॉ. कमलताई गवई यांनी शिक्षण, आत्मविश्वास आणि चिकाटीचे महत्त्व सांगितले. “परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वप्नांच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. स्वप्ने लहान नसतात, ती पूर्ण करण्याची ताकद आपल्यातच असते,” असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.
डॉ. गवई यांनी मुलींना आत्मविश्वास देत सांगितले की, “तुम्ही शिकलात, तर मेळघाटला लागलेला कुपोषणाचा कलंक दूर होण्यास तुमचे शिक्षण उपयुक्त ठरेल. तसेच, आदिवासिंचा जीवनस्तर उंचावण्यासाठीही ते मैलाचा दगड ठरेल.”

माईंच्या कार्याला विनम्र अभिवादन
डॉ. कमलताई गवई यांचे वसतिगृहात आगमन होताच विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर निरागस आनंद ओसंडून वाहत होता. त्यांनी पुष्पगुच्छ देऊन मातेसमान त्यांचे स्वागत केले. डॉ. कमलताईंनीही त्यांच्यावर प्रेमळ मायेचा हात फिरवत आईची ऊब दिली. त्यानंतर त्यांनी समाजमाता सिंधुताई सपकाळ यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन केले.
हा हृदयस्पर्शी क्षण अनुभवताना संस्थेचे अध्यक्ष दीपक गायकवाड यांनी, माईंच्या अथक परिश्रमातून उभ्या राहिलेल्या या वसतिगृहात आचार्य डॉ. कमलताई गवई यांच्या रूपाने एक प्रेमळ व्यक्ती आल्याची भावना व्यक्त केली. हा प्रेरणादायी क्षण विद्यार्थिनींसाठी कायम स्मरणात राहील.
© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
