71

चिमुकल्यांच्या स्वप्नांना नवी भरारी; आयुक्त दाम्पत्याने ‘स्नेहवन’मधील मुलांसोबत साजरी केली दिवाळी!
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ८ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: दिवाळी म्हणजे आनंदाची देवाणघेवाण, प्रेमाची उधळण आणि नात्यांमधील जिव्हाळा जपण्याचा सण! याच सणाचा खरा आनंद समाजातील गरजू आणि वंचित मुलांच्या चेहऱ्यावर फुलविण्याचा संवेदनशील प्रयत्न पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि त्यांच्या पत्नी डॉ. आरती सूर्यवंशी यांनी केला. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षण व संगोपनासाठी अहोरात्र झटणाऱ्या आळंदीजवळील कोयाळी फाटा येथील ‘स्नेहवन’ संस्थेतील चिमुकल्यांसोबत त्यांनी यंदाची दिवाळी अत्यंत उत्साहात साजरी केली.
यावेळी आयुक्त दाम्पत्याने मुलांसोबत फराळाचा आनंद घेतला, त्यांच्याशी सविस्तर गप्पा मारत त्यांच्या स्वप्नांना जाणून घेतले आणि त्यांच्या शिक्षणाच्या वाटेवर नवी भरारी घेण्यासाठी ‘टॅब’ची अनमोल भेट दिली. अशोक देशमाने व अर्चना देशमाने चालवत असलेल्या या संस्थेतील मुलांची दिवाळी या प्रेमळ भेटीमुळे खऱ्या अर्थाने प्रकाशमय झाली.

या भेटीतील सर्वांत भावस्पर्शी क्षण ठरला तो म्हणजे आयुक्त दाम्पत्य आणि मुलांमधील मनमोकळा संवाद. मुलांनी आयुक्तांना त्यांच्या शैक्षणिक प्रवासातील अडचणी, प्रशासकीय सेवांमधील संघर्ष आणि महापालिकेच्या कामकाजाबाबत अनेक प्रश्न विचारले. आयुक्तांनीही अत्यंत आपुलकीने सर्व प्रश्नांची उत्तरे दिली.
आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले की, “आर्मी ऑफिसर, कस्टम अधिकारी ते जिल्हाधिकारी आणि आता महापालिका आयुक्त असा माझा प्रवास राहिला आहे. शिक्षण घेताना अडचणी येऊ शकतात, मात्र आपला आत्मविश्वास कधीच कमी पडू देऊ नका. कोणत्याही परिस्थितीत शिक्षण थांबवू नका. रोज काहीतरी नवीन शिका, नियमित अभ्यास करा आणि वाचनाची सवय ठेवा. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जिद्द आणि सातत्य अत्यंत महत्त्वाचे आहे.”
राज्यातील शेतकरी आत्महत्यांच्या गंभीर प्रश्नावर बोलताना त्यांनी अत्यंत भावनिक आवाहन केले की, “कितीही कठीण काळ असला, तरी शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये. शासन नेहमी आपल्या पाठीशी आहे. संयमाने व धैर्याने संकटांचा सामना करा.”

डॉ. आरती सूर्यवंशी यांनीही मुलांच्या जिद्दीचे आणि आत्मविश्वासाचे मनापासून कौतुक केले. त्या म्हणाल्या, “आज येथे मुलांसोबत दिवाळी साजरी करताना मन आनंदित झाले. आयुष्यातील वडिलांचे छत्र हरवले असले, तरी प्रत्येकाच्या मनात एक दुर्दम्य शक्ती असते. त्या शक्तीला ओळखून तिला जागृत करा. स्नेहवनसारख्या संस्थांच्या माध्यमातून मिळणारे योग्य शिक्षण आणि संस्कार हीच उद्याच्या सक्षम भारताची पायाभरणी आहे. या मुलांमध्ये मला भाविष्यातील आयएएस अधिकारी, आयटी तज्ज्ञ आणि वैज्ञानिक दिसत आहेत.”
या भेटीदरम्यान स्नेहवनमधील विद्यार्थ्यांनीच आयुक्त दाम्पतेला संपूर्ण परिसर, शाळा आणि विविध लॅबची सफर घडवून आणली. मुलांनी गोशाळा, बायोगॅस प्रकल्प, सौरऊर्जा प्रकल्प, ओपन जिम, स्किल डेव्हलपमेंट सेंटर, बेकरी प्रशिक्षण केंद्र, एमपीएससी-यूपीएससी प्रशिक्षण केंद्र, सायन्स लॅब आणि कंटेनर ग्रंथालय अशा तब्बल १५ प्रकारच्या लॅबची माहिती अत्यंत आत्मविश्वासाने समजावून सांगितली. चिमुकल्यांच्या या प्रगल्भ ज्ञानाची व जिद्दीची महनीय अनुभूती घेत आयुक्त दाम्पत्य भारावून गेले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
