Home पिंपरी चिंचवड ‘देश-धर्मासाठी कसे मरावे हे शंभुराजांनी शिकवले!’ – प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे प्रभावी व्याख्यान!

‘देश-धर्मासाठी कसे मरावे हे शंभुराजांनी शिकवले!’ – प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे प्रभावी व्याख्यान!

शंभुराजांनी जगाला मरणाची कला शिकवली! प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांचे प्रभावी विचार.

by maxmanthannews@gmail.com
0 comments

पिंपरी, ११ मे २०२५ (मॅक्स मंथन डेली न्यूज): “स्वराज्यासाठी कसे जगावे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी जगाला दाखवले; तर देश आणि धर्मासाठी कसे मरावे, हे छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवले!” असे ज्वलंत उद्गार सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांनी काढले. चिंचवड येथील श्री दत्त मंदिर चौकात जय भवानी तरुण मंडळाच्या वतीने आयोजित सहा दिवसीय शिव – फुले – शाहू – आंबेडकर – लोकमान्य व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प ‘छत्रपती संभाजीमहाराज : धगधगती अंगारगाथा’ या विषयावर गुंफताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बांधकाम व्यावसायिक सागर धुमाळ होते, तर उद्योजक भगवान पठारे आणि माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांनी आपल्या प्रभावी वाणीतून छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “प्रतिकूल परिस्थितीतही कसे जगायचे, याचा आदर्श शंभुराजांनी घालून दिला. १४ मे १६५७ रोजी जन्मलेल्या या तेजस्वी बालकाचे ‘संभाजीराजे’ असे नामकरण जिजाऊ माँसाहेबांनी केले. केवळ दोन वर्षांचे असताना त्यांनी आपल्या आईला गमावले. तरीही, धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतीशास्त्र आणि राज्यशास्त्र यांसारख्या अनेक विषयात त्यांनी प्रावीण्य मिळवले. इंग्रजीसह तब्बल सोळा भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. काव्यरचना आणि संस्कृत भाषेतील ‘बुधभूषण’ यांसारख्या ग्रंथांचे लेखन त्यांनी केले. यासोबतच, मल्लखांब आणि घोडेस्वारीमध्येही ते निष्णात होते. आगऱ्यातून सुटका करून घेताना शिवाजी महाराजांनी शत्रूंना चकवण्यासाठी शंभुराजे यांचे निधन झाल्याची खोटी बातमी पसरवली; पण त्यानंतर मृत्यू सतत त्यांचा पाठलाग करत राहिला. शिवाजी महाराजांनी सोपवलेली प्रत्येक जबाबदारी शंभुराजांनी अत्यंत निष्ठापूर्वक पार पाडली. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर शंभुराजांविरुद्ध अनेक कारस्थाने रचली गेली; पण हंबीररावांनी ती सर्व हाणून पाडली. त्यांच्यावर तीन वेळा विषप्रयोग झाला. छत्रपती झाल्यानंतर शंभुराजांनी जेव्हा बुऱ्हाणपूर लुटले, तेव्हा औरंगजेब संतापला आणि आपल्या प्रचंड सैन्यासह स्वराज्यावर चालून आला. शंभुराजांना पराभूत केल्याशिवाय डोक्यावर बादशाही पगडी घालणार नाही, अशी त्याने प्रतिज्ञा केली होती; पण शेवटपर्यंत त्याला ती संधी मिळाली नाही. दुर्दैवाने, परिस्थितीने शंभुराजांना साथ दिली नाही आणि ते शत्रूच्या तावडीत सापडले. त्यांनी असह्य अत्याचार आणि अपमान सहन केले आणि अखेरीस बलिदान दिले. पण, इतिहासाला त्यांची नोंद एकाही लढाईत पराभूत न होणारा राजा म्हणून घ्यावी लागली. नाट्य आणि चित्रपटसृष्टीतून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न झाला; पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्याइतकेच शंभुराजांचे चरित्र निष्कलंक होते!” प्रा. बानगुडे-पाटील यांच्या ओघवत्या आणि आवेशपूर्ण वाणीने श्रोते मंत्रमुग्ध झाले.

या कार्यक्रमाच्या आयोजनात प्रकाश हगवणे, राम नलावडे, शरद थोरात, विक्रम पवार आणि जितेंद्र छाबडा यांनी सहकार्य केले. राजेंद्र घावटे यांनी सूत्रसंचालन केले, तर मारुती भापकर यांनी आभार मानले.

You may also like

Leave a Comment