युवक-युवतींशी संवाद साधून केले मार्गदर्शन
पिंपरी, दि. १३ मे २०२५: “लाईटहाऊस प्रकल्प हे केवळ प्रशिक्षण केंद्र नसून, युवकांच्या स्वप्नांना दिशा देणारे परिवर्तनाचे व्यासपीठ आहे. येथील प्रशिक्षणामुळे तरुणांच्या सुप्त गुणांना चालना मिळते, आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्या भविष्यासाठी सशक्त पाया उभारण्यात मदत होत आहे. प्रत्येक युवकामध्ये प्रचंड ऊर्जा आणि कल्पनाशक्ती असून त्यांना योग्य मार्गदर्शनाची आणि संधीची गरज आहे. लाईटहाऊस हे याच संधीचे दार आहे,” असे प्रतिपादन आयुक्त शेखर सिंह यांनी केले.
आयुक्त शेखर सिंह आणि समाज विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांनी आज निगडी येथील कौशल्यम – लाईटहाऊस कौशल्य विकास केंद्राला भेट दिली. या भेटीत त्यांनी प्रशिक्षण पूर्ण करून यशस्वीरित्या नोकरी मिळविलेल्या युवक-युवतींशी थेट संवाद साधला.

यावेळी युवकांनी कौशल्य प्रशिक्षण घेतल्यानंतर समाजात आणि उद्योगक्षेत्रात स्वतःची निर्माण केलेली ओळख, आर्थिक स्वावलंबनाकडे केलेली वाटचाल आणि आत्मविश्वासाने अडचणींवर केलेली मात अशा अनेक गोष्टी आयुक्तांना सांगितल्या. यानंतर आयुक्त सिंह यांनी लाईटहाऊसच्या टीमसोबत केंद्राच्या कार्यपद्धती, यशस्वी प्रकल्पांची माहिती, प्रशिक्षण मॉड्यूल्स आणि आगामी योजनांची सविस्तर माहिती घेतली.
आयुक्त शेखर सिंह यावेळी म्हणाले, “२०२५-२६ या वर्षात लाईटहाऊस टीमने स्थानिक पातळीवर अधिकाधिक युवकांपर्यंत पोहोचावे. प्रशिक्षण घेणाऱ्या युवकांच्या आकांक्षा, उद्योगजगतातील गरजा आणि सामाजिक बदलांची गरज यांचा समन्वय साधून योग्य कौशल्ये व रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात. प्रशिक्षण घेतलेल्या युवकांनी इतर तरुणांनाही या प्रवासात सहभागी होण्यासाठी प्रेरित करावे.”

लाईटहाऊसमधील प्रशिक्षणार्थी पायल कांबळे यांनी सांगितले, “लाईटहाऊसमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर माझा आत्मविश्वास खूप वाढला. पूर्वी मला नोकरी मिळेल की नाही याची खात्री नव्हती. लाईटहाऊसमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर माझ्यातल्या क्षमता ओळखायला मिळाल्या. आज मला मनासारखी नोकरी मिळाली असून मी आनंदाने ती करत आहे.”
कौशल्यम-लाईटहाऊस प्रकल्पाचे महत्त्व
लाईटहाऊस हा प्रकल्प पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असून, १८ ते ३५ वयोगटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, तसेच सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना मोफत कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
