पिंपरी (मॅक्स मंथन डेली न्यूज): निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात शुक्रवारी ‘इतना तो याद हैं मुझे…’ या हिंदी-मराठी संस्मरणीय गीतांच्या ऑडिओ-व्हिज्युअल सांगीतिक मैफिलीने रसिकांना मंत्रमुग्ध केले. विविध भारती म्युझिकल इव्हेंट प्रस्तुत या नि:शुल्क कार्यक्रमाला संगीतप्रेमींचा उदंड प्रतिसाद लाभला. दिशा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब जवळकर यांच्यासह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते.
गायक कलाकार विनायक कदम, नंदकुमार कांबळे, अनिल जंगम, अरुण सरमाने, डॉ. सायली बांबुरडे, नेहा दंडवते, डॉ. किशोर वराडे, पिनाक भिंगारे, स्वाती भागवत, सुहास पालेकर आणि विशेष अतिथी गायक विजय वाघमारे व ललिता जगदाळे यांनी आपल्या सुरेल आवाजाने चित्रपटसंगीतातील लोकप्रिय आणि काही विस्मरणात गेलेली सुंदर गाणी सादर केली, ज्याने श्रोत्यांची मने जिंकली. बालकलाकार देवश्री कदम आणि अंकिता जंगम यांनी ‘लगान’मधील ‘मधुबन में…’ या गाण्यावर केलेले आकर्षक नृत्य मैफिलीतील एक खास आकर्षण ठरले.
‘फर्स्ट टाइम देखा तुझे…’, ‘याद तेरी आयेगी…’, ‘हर घडी बदल रही…’, ‘तेरी तस्वीर मिल गयी…’, ‘मैं तो एक ख्वाब हूं…’, ‘ओ मेरे सपनों के सौदागर…’, ‘ओ सजना बरखा बहार आयी…’, ‘तुम को देखा तो…’, ‘तुने अभी देखा नही…’, ‘ना तुम हमें जानो…’ यांसारख्या एकापेक्षा एक सरस एकल गीतांनी आणि ‘दिल जाने जिगर…’, ‘लागी छुटे ना…’, ‘रब को याद करू…’, ‘फूल तुम्हे भेजा हैं…’, ‘चेहरा क्या देखते हो…’, ‘हम जिस रस्ते पे चले…’, ‘इन्तेहा हो गयी…’, ‘आँखोसें दिल में…’, ‘तू मेरा जानू हैं…’, ‘एक हसीना थी…’, ‘प्यार तो एक दिन…’, ‘बादल यूं गरजता हैं…’, ‘तुज संग प्रीत…’ या युगल गीतांनी वातावरण संगीतमय केले. मैफिलीचे शीर्षक गीत ‘इतना तो याद हैं मुझे…’ च्या प्रभावी सादरीकरणाला रसिकांनी भरभरून दाद दिली. कुमार शानू यांच्या आवाजातील गाण्यांची जादू विनायक कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्तमरीत्या जिवंत केली.
या कार्यक्रमाचे संयोजन विनायक कदम आणि नंदकुमार कांबळे यांनी केले. सचिन शेटे यांचे विशेष सहकार्य लाभले. ध्वनी शैलेश घावटे यांनी सांभाळला, तर दृकश्राव्य बाजू सौमिल घावटे यांनी पाहिली. सुहास चांगण यांनी छायाचित्रण केले आणि दृश्यनिर्मिती विक्रम क्रिएशनच्या मदतीने साकारली गेली. कार्यक्रमाचे निवेदन अरुण सरमाने आणि स्वाती भागवत यांनी केले, तर नंदकुमार कांबळे यांनी आभार मानले.
