पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा ‘सुपरफास्ट एक्सप्रेस’ मार्ग मोकळा! मेट्रो विस्तार, पुनावळे अग्निशमन केंद्र आणि दिघी-बोपखेल जलनिस्सारण कामांसह कोट्यवधींच्या विकासकामांना स्थायी समितीची मंजुरी
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, २४ जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: “पिंपरी-चिंचवड हे देशातील सर्वाधिक वेगाने आणि सुनियोजितपणे विकसित होणारे शहर आहे. शहराचा हा वाढता विस्तार लक्षात घेऊन दळणवळण व्यवस्था सुकर करणे, दर्जेदार आरोग्य सुविधा देणे आणि पायाभूत सुविधांचे जाळे सक्षम करणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. स्थायी समितीने आज घेतलेले सर्व निर्णय हे केवळ प्रशासकीय प्रस्ताव नसून, ते शहरवासीयांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करून त्यांच्या जीवनमानात गुणात्मक बदल घडवून आणणारे आहेत. नियोजित कालमर्यादेत आणि अत्यंत पारदर्शक पद्धतीने ही सर्व कामे पूर्ण करण्यासाठी आमचे प्रशासन कटीबद्ध आहे,” असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती श्री. अभिषेक बारणे यांनी केले.
महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील स्थायी समिती दालनात सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या साप्ताहिक बैठकीत शहराच्या कायापालटाशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विकासकामांना मंजुरी देण्यात आली. या बैठकीला स्थायी समिती सदस्यांसह अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर आणि नगरसचिव मुकेश कोळप यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पिंपरी ते निगडी दरम्यान सुरू असलेल्या मेट्रो मार्गिकेच्या विस्ताराला गती देण्यासाठी स्थायी समितीने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा-मेट्रो) मार्फत राबविण्यात येत असलेल्या पुणे मेट्रो फेज-१ विस्तार प्रकल्पांतर्गत निगडी येथील अतिरिक्त चौथ्या मेट्रो स्थानकासाठी आवश्यक असणाऱ्या महापालिकेच्या हक्काच्या आर्थिक तरतुदीला (अंशदान) मंजुरी देण्यात आली. या निधीच्या मंजुरीमुळे मेट्रोच्या कामाला कमालीची गती मिळणार असून, निगडी, प्राधिकरणातील लाखो नोकरदार व विद्यार्थ्यांना जलद सार्वजनिक वाहतुकीचा मोठा पर्याय उपलब्ध होईल.
पावसाळ्याच्या तोंडावर आणि वाढत्या लोकसंख्येचा ताण लक्षात घेऊन पाणी व मलनिस्सारण व्यवस्था बळकट करण्यावर भर देण्यात आला आहे: १) ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत दिघी आणि बोपखेल परिसरातील जुन्या व कमकुवत झालेल्या मलनिस्सारण (ड्रेनेज) नलिकांमध्ये तातडीने सुधारणा करून नव्या वाहिन्या टाकण्याचे काम मंजूर करण्यात आले. २) दापोडी पंपिंग स्टेशन ते दापोडी एस.टी. स्टँड दरम्यानच्या मुख्य रायझिंग मेन जलनिस्सारण वाहिनीचे अद्ययावतीकरण व उन्नतीकरण करण्यास मान्यता मिळाली. ३) मामुर्डी येथील साईनगर उंच जलकुंभाच्या (Water Tank) कार्यक्षेत्रात नव्याने विकसित होत असलेल्या गृहप्रकल्पांच्या भागामध्ये मुबलक दाबाने पाणी देण्यासाठी नवीन जलवाहिन्या टाकण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शहराच्या सुरक्षिततेशी आणि आपत्कालीन परिस्थितीशी तडजोड न करण्याचे स्थायी समितीने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. झपाट्याने विकसित होत असलेल्या वाकड व पुनावळे परिसराची गरज ओळखून पुनावळे येथील नियोजित अग्निशमन केंद्राच्या बांधकामासाठी सुधारित खर्चाला स्थायी समितीने मान्यता दिली. शहरात कुठेही विषारी वायू गळती किंवा रासायनिक दुर्घटना घडल्यास तात्काळ शोध घेऊन बचावकार्य करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागासाठी अत्याधुनिक ‘गॅस डिटेक्टर’ उपकरणे खरेदी करण्यास मंजुरी दिली. महापालिकेच्या सर्व मोठ्या प्रशासकीय इमारती, जलशुद्धीकरण केंद्रे आणि पंपिंग स्टेशनमधील अग्निशामक यंत्रणेच्या अविरत देखभालीच्या कामांना मान्यता देण्यात आली.
गरिबांच्या आरोग्यासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी स्थायी समितीने मोलाचे आर्थिक निर्णय घेतले. यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील १४ पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडील (NMC) आवश्यक वार्षिक मान्यता प्रक्रियेचे शुल्क भरण्यास मान्यता दिली. रुग्णालयातील गर्भवती महिला व गोरगरीब रुग्णांना विनामूल्य सेवा देण्यासाठी सोनोग्राफी यंत्रणेची दुरुस्ती व नियमित वार्षिक देखभाल तात्काळ सुरू केली जाईल. प्रभाग क्रमांक १ मधील महानगरपालिका प्राथमिक शाळा क्रमांक ९० आणि २१ च्या वर्गखोल्यांचे व इमारतीचे सुशोभीकरण व दुरुस्ती केली जाईल.
नागरी सुख-सुविधांच्या विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी कामांना गती देण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक ११ मधील कोयनानगर, मोरया हाऊसिंग सोसायटी आणि सीडीसी परिसरातील खराब झालेल्या रस्त्यांचे ‘हॉटमिक्स’ पद्धतीने आधुनिक डांबरीकरण करण्यास मान्यता देण्यात आली. महापालिका हद्दीतील विद्युत विषयक सेवा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक कुशल व अकुशल मनुष्यबळ पुरवणे आणि कै. अण्णासाहेब मगर सदनिका संकुल व केशवनगर-चिंचवडमधील मुख्य विद्युत वाहिन्यांच्या दुरुस्तीला मंजुरी मिळाली. पुणे-आळंदी रस्त्यावरील पावसाळी वाहिन्या आणि रस्त्यालगतची सर्व मोठी गटारे पावसाळ्यात पाणी तुंबू नये म्हणून स्वच्छ व दुरुस्त करण्याचे आदेश देण्यात आले.
शहरातील सांस्कृतिक वैभवाला आणि आरोग्याला चालना देणारे इतर महत्त्वपूर्ण निर्णय पिंपरी-चिंचवडमधील उदयोन्मुख स्थानिक कलाकारांना भव्य हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी महापालिकेतर्फे ‘अभिव्यक्ती कलामहोत्सव’ आयोजित करण्यास आणि त्याच्या खर्चास मंजुरी दिली. ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत शहरात डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी डास प्रतिबंधक ‘औष्णिक धुरीकरण’ (Fogging) वाहनांच्या सुविधेला कार्योत्तर मंजुरी देऊन आरोग्य मोहीम अधिक वेगवान करण्यात आली. भोसरी येथील शांतीनगर परिसरातील रहिवाशांच्या आरोग्यासाठी येथील सार्वजनिक शौचालयाची दैनंदिन स्वच्छता अखंडित राखण्यासाठी ‘रोहिणी महिला बचत गटाला’ मुदतवाढ देण्यात आली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


