news
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पिंपरी-चिंचवड मनपा ‘ॲक्शन मोड’वर; ‘घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६’ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी भव्य कार्यशाळा!निवडणुकीत लाडक्या असलेल्या बहिणी आता परक्या का झाल्या? ८० लाख महिलांना अपात्र केल्याने कष्टकरी संघर्ष महासंघाचे तहसील कचेरीवर ‘रुसवा आंदोलन’!पिंपळे सौदागरच्या काटे पेट्रोल पंप चौकात प्रवाशांचे अतोनात हाल; वाटसरू धुळीतभोसरीत ‘ये रे माझ्या मागल्या’! पोलीस आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली; ‘नो पार्किंग’ झोनमध्ये रिक्षाचालकांचा धुमाकूळ, वाहतूक पोलीस गेले कुठे?पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर दिवंगत भिकू वाघेरे पाटील यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण अभिवादन!
Home पुणे अपघातानंतर माणुसकीला काळिमा! गंभीर जखमी तरुणाला रुग्णालयाऐवजी गाडीत घालून मृतदेह हायवेवर फेकला; म्हाळुंगे पोलिसांकडून ४८ तासांत नराधम आरोपी जेरबंद

अपघातानंतर माणुसकीला काळिमा! गंभीर जखमी तरुणाला रुग्णालयाऐवजी गाडीत घालून मृतदेह हायवेवर फेकला; म्हाळुंगे पोलिसांकडून ४८ तासांत नराधम आरोपी जेरबंद

सीसीटीव्ही आणि पोलीस नाईक काळे यांच्या सतर्कतेमुळे संशयित पिकअपचा माग काढण्यात यश; आरोपी मेहबूब शेख याच्यावर आता थेट सदोष मनुष्यवधाचा (BNS १०५) गुन्हा!

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ६ जून २०२६ म्हाळुंगे:

म्हाळुंगे (चाकण): रस्त्यावरून पायी रस्ता ओलांडत असताना एका भरधाव पिकअप वाहनाने धडक दिल्यानंतर, गंभीर जखमी झालेल्या तरुणाला वाचवण्याऐवजी स्वतःच्या गाडीत घालून पळवून नेणाऱ्या आणि नंतर त्याचा मृतदेह पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत फेकून देणाऱ्या अत्यंत निर्दयी आरोपीला उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या ४८ तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी केवळ आरोपीला जेरबंद केले नाही, तर त्याच्याविरोधात अत्यंत गंभीर अशा भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम १०५ अन्वये सदोष मनुष्यवधाचा वाढीव गुन्हा दाखल केला आहे. पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, गुरुवार, दि. ४ जून २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजण्याच्या सुमारास चाकण-तळेगाव रोडवर, खालुम्ब्रे (ता. खेड, जि. पुणे) येथील एचपी (HP) पेट्रोल पंपाच्या समोर हा भीषण अपघात झाला होता. मनोज कुमार रामजी विश्वकर्मा (वय ३५ वर्षे, सध्या रा. किरण शिंदे यांच्या भाड्याच्या रूममध्ये, खालुम्ब्रे, ता. खेड, जि. पुणे) हा तरुण पायी चालत रस्ता ओलांडत असताना एका भरधाव अज्ञात पिकअप वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत मनोज कुमार अत्यंत गंभीर जखमी झाला. अपघाताचा प्रकार गंभीर असल्याचे पाहून त्या गाडीच्या अज्ञात चालकाने खाली उतरून जखमी मनोज याला रस्त्यावरून उचलले आणि पोलिसांच्या किंवा लोकांच्या भीतीने स्वतःच्या गाडीमध्ये घालून तेथून पळवून नेले.

या धक्कादायक प्रकारानंतर म्हाळुंगे पोलीस ठाण्यात सुरुवातीला अज्ञात वाहनाविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१, १२५(a), १२५(b) आणि मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम १८४, १९९, १७७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या अपघातातील पळून गेलेल्या वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तातडीने तपास पथक तैनात केले होते. तपासादरम्यान म्हाळुंगे तपास पथकातील पोलीस नाईक काळे यांनी अपघात घडलेल्या ठिकाणचे आणि आजूबाजूचे सर्व सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांचे फुटेज अत्यंत बारकाईने तपासले. त्यांच्या या सतर्कतेमुळे अपघातातील वाहन हे महिंद्रा बोलेरो पिकअप (Mahindra Bolero Pickup) असल्याचे निष्पन्न झाले, तसेच त्याचा आरटीओ क्रमांक MH-12 ZE 0779 असल्याचे पोलिसांनी हुडकून काढले. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि वाहनाचा माग काढला असता अत्यंत धक्कादायक वास्तव समोर आले. पिकअप चालकाने मनोज कुमार अत्यंत गंभीर जखमी अवस्थेत असताना त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल न करता गाडीतच डांबून ठेवले. योग्य वेळी वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे मनोज कुमार रामजी विश्वकर्मा यांचा गाडीतच तडफडून दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर आपला गुन्हा लपवण्यासाठी आणि पुरावा नष्ट करण्यासाठी या निर्दयी चालकाने मनोज कुमार यांचा मृतदेह गुपचूपपणे शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्यावर फेकून दिला आणि तिथून तो फरार झाला.

गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला वेळेत उपचार न मिळाल्यास त्याचा मृत्यू होऊ शकतो, याची पूर्ण जाणीव असतानाही आरोपी चालकाने केवळ स्वतःचा बचाव करण्यासाठी हे क्रूर कृत्य केले. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कडक वाढीव कलम १०५ (सदोष मनुष्यवध – हत्या नसलेला गुन्हेगारी प्रकार) समाविष्ट केले. म्हाळुंगे पोलिसांनी तातडीने छापेमारी करत या गुन्ह्यातील मुख्य आरोपी चालक मेहबूब लकीब मोहम्मद शेख (वय ४० वर्षे, रा. जवळा, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) याला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी मेहबूब शेख याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दि. ९ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी (PMR) मंजूर केली आहे.

या संपूर्ण प्रकरणाचा पुढील सखोल तपास उत्तर म्हाळुंगे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिस मुल्ला करत आहेत. ही उत्कृष्ट कामगिरी पिंपरी-चिंचवडच्या पोलीस उप आयुक्त (परिमंडळ-४) श्रीमती श्वेता खेडकर यांच्या थेट मार्गदर्शनाखाली म्हाळुंगे पोलिसांनी केली आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!