पिंपरी, दि. २८ एप्रिल, २०२५: पिंपरी चिंचवड आणि पुणे शहराच्या सीमेवरून वाहणाऱ्या मुळा-मुठा, पवना आणि इंद्रायणी नद्यांच्या काठावर मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. या वृक्षतोडीविरोधात २७ एप्रिल २०२५ रोजी पिंपळे निलख येथे पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील जागरूक नागरिकांनी निषेध मोर्चा काढला होता.
या निषेध मोर्चाची दखल घेत विधानसभा उपाध्यक्ष नामदार आण्णा बनसोडे यांनी तात्काळ वृक्षतोडीचे काम थांबवण्याचे आदेश दिले होते. मात्र, लोकसेवक युवराज दाखले यांनी आरोप केला आहे की, आयुक्त शेखर सिंह यांनी नामदार आण्णा बनसोडे यांच्या या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे, जे अत्यंत चुकीचे आहे.
आयुक्त शेखर सिंह यांनी वृक्षतोडीचे काम सुरू ठेवल्यामुळे त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
या संदर्भात बोलताना लोकसेवक युवराज दाखले म्हणाले की, विधानसभा उपाध्यक्षांनी दिलेला आदेश हा विधिमंडळाचा आदेश असतो आणि आयुक्तांनी त्याचे उल्लंघन करणे हे गंभीर आहे. पर्यावरणप्रेमी नागरिकांच्या भावनांचा आदर राखला गेला पाहिजे आणि बेकायदेशीर वृक्षतोड त्वरित थांबवली पाहिजे. आयुक्तांच्या या भूमिकेमुळे लोकप्रतिनिधींच्या अधिकारांचा अवमान झाला आहे, त्यामुळे त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई होणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मागणीवर काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पिंपरी चिंचवडमधील वृक्षतोडीचा मुद्दा आणि आयुक्तांवरील हक्कभंगाच्या कारवाईची मागणी यामुळे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.