चिंचवड (मॅक्स मंथन डेली न्यूज): पावसाळ्यापूर्वी नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आमदार शंकर जगताप यांनी थेट रस्त्यावर उतरून पाहणी केली. त्यांनी चिंचवड मतदारसंघातील विविध भागांना भेट देऊन मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेतला आणि प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
आमदार जगताप यांनी पुनावळे, किवळे, वाकड आणि वाल्हेकरवाडी परिसरातील नालेसफाई, रस्त्यांवरील खड्डे, अतिक्रमण आणि पाणी निचऱ्याच्या समस्यांची प्रत्यक्ष पाहणी केली.
पुनावळे परिसरातील पाहणी:
पुनावळे अंडरपासखालील रस्त्यांवरील खड्डे तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश आमदार जगताप यांनी दिले. तसेच, जलवाहिन्यांची स्वच्छता करून नवीन स्ट्रॉम वॉटर लाईन टाकण्याची सूचना केली. भारत पेट्रोल पंपासमोरील पाणी साचण्याची समस्या लक्षात घेऊन तिथेही स्ट्रॉम वॉटर लाईन टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. यासोबतच, पुनावळे सर्व्हिस रोडवरील अतिक्रमण त्वरित हटवण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
किवळे आणि समीर लॉन्स परिसर:
समीर लॉन्स अंडरपासजवळ जुन्या स्ट्रॉम वॉटर लाईनमुळे येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन नवीन लाईन टाकण्याचे आदेश देण्यात आले. किवळे परिसरातील नाल्यांमधील गाळ काढण्याचे आणि अर्धवट असलेले स्क्रीनिंगचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना पर्यावरण विभागाला देण्यात आल्या.
वाहतूक नियोजन आणि स्मशानभूमी:
मुकाई चौक ते वाकड दरम्यान होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी, मुकाई चौकातून वाकडकडे जाणारी वाहतूक एकेरी करण्याचे आदेश बीआरटीएस आणि स्थापत्य विभागाला देण्यात आले. वाल्हेकरवाडीतील अपूर्ण स्मशानभूमीच्या कामाची पाहणी करून ते तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही आमदार जगताप यांनी दिले.
सोसायट्यांमधील पाणी साचण्याच्या समस्या:
गोखले वृंदावन आणि शांतीवन सोसायटी समोरील स्ट्रॉम वॉटर लाईनमुळे प्रवेशद्वारावर पाणी साचत असल्याने, तिथे रॅम्प तयार करण्याचे आदेश देण्यात आले. चापेकर चौक ते वाल्हेकरवाडी कॉर्नरपर्यंत स्ट्रॉम वॉटर लाईन टाकून नव्याने रस्ता बनवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. सिल्वर गार्डन सोसायटी परिसरात लाईन नसल्याने निर्माण होणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश आमदार जगताप यांनी दिले.
एनएचएआयच्या कामांची पाहणी:
आमदार जगताप यांनी एनएचएआयमार्फत सुरू असलेल्या सर्व्हिस रोडच्या कामांची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना कामे लवकर पूर्ण करून पावसाचे पाणी व्यवस्थित निचरा होईल याची खात्री करण्याचे निर्देश दिले.
या पाहणी दौऱ्यात आमदार शंकर जगताप यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि पावसाळ्यापूर्वी सर्व आवश्यक कामे पूर्ण करण्यावर भर दिला. या दौऱ्यात माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे यांच्यासह अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.