भारत आणि कोरिया: शिक्षण, संस्कृती आणि रोजगाराच्या नव्या संधी! पिंपरी चिंचवड विद्यापीठाची महत्त्वपूर्ण भूमिका!
पिंपरी चिंचवड (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज): भारत आणि कोरिया या दोन राष्ट्रांमध्ये शिक्षण, संस्कृती आणि जागतिक स्तरावरील रोजगार, उद्योग, व्यापाराच्या अनेक संधी नव्याने निर्माण होत आहेत. या संधींना अधिक व्यापक करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये शैक्षणिक आणि पर्यटन संवाद (एज्युकेशनल टुरिझम टॉक) होणे अत्यंत आवश्यक आहे. याच दृष्टिकोनातून पिंपरी चिंचवड विद्यापीठाने (पीसीयू) उचललेले पाऊल भारत आणि कोरिया यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा ठरू पाहत आहे.
कोरिया टुरिझम ऑर्गनायझेशन (केटीओ) च्या सहकार्याने पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचलित पिंपरी चिंचवड विद्यापीठात नुकताच ‘कोरियन एज्यू टूर रोड शो’ आयोजित करण्यात आला. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात केटीओ इंडियाचे क्षेत्रीय संचालक मायॉंग किल युन यांनी मार्गदर्शन करताना विश्वास व्यक्त केला की, हा करार आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्याच्या संधी शोधण्यासाठी एक यशस्वी माध्यम ठरेल.
यावेळी महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. शैलेश देवळलणकर आणि पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्यासह राज्यभरातील १२५ हून अधिक शाळा आणि महाविद्यालयांचे मुख्याध्यापक व प्राचार्य उपस्थित होते.
मायॉंग किल युन यांनी सांगितले की, कोरिया आता केवळ के-ड्रामा, के-पॉप आणि खाद्यसंस्कृतीसाठीच नव्हे, तर नवोन्मेष, उच्च शैक्षणिक गुणवत्ता आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरांचा संगम म्हणूनही ओळखला जाईल. त्यामुळे भारतातील शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थ्यांना कोरियाशी संबंध प्रस्थापित करण्यात आणि तेथील बहुआयामी संधी शोधण्यात मदत करण्यासाठी केटीओ कार्यरत आहे.
डॉ. शैलेश देवळलणकर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि दक्षिण कोरिया हा भारताचा अत्यंत जवळचा मित्र देश असल्याचे सांगितले. त्यांनी महाराष्ट्रात एक दिवस कोरियन शिक्षण प्रणालीला समर्पित करून साजरा करण्याचा विचार व्यक्त केला. ‘स्टडी इन कोरिया’ या उपक्रमांतर्गत कोरिया टुरिझम ऑर्गनायझेशनद्वारे (केटीओ) लवकरच भारतात एक कोरियन विद्यापीठ स्थापन होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. या शैक्षणिक सामंजस्य करारामुळे भारत आणि कोरियाचे संबंध अधिक दृढ होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र शासन विद्यार्थ्यांच्या देवाण-घेवाण कार्यक्रमांसाठी, शैक्षणिक कार्यक्रमांच्या आयोजनासाठी, उद्योग क्षेत्रातील भेटींसाठी किंवा इंटर्नशिपच्या संधींसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यास तयार आहे, असे आश्वासन डॉ. देवळलणकर यांनी दिले. महाराष्ट्र हे शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या दृष्टीने भारतातील एक सर्वोत्तम राज्य असल्याचेही त्यांनी नमूद केले.
डॉ. गिरीश देसाई यांनी सांगितले की, या उपक्रमामुळे कोरियाला एक प्रमुख शैक्षणिक ओळख मिळवण्याची संधी मिळाली आहे. सांस्कृतिक अनुभव, शैक्षणिक विनिमय आणि अभ्यास दौऱ्यांच्या दृष्टीने दक्षिण कोरिया एक अत्यंत समृद्ध केंद्र आहे. पीसीईटी आणि पीसीयूने अलीकडेच कोरियातील सॅमयुंग विद्यापीठ (Sangmyung University) आणि कांगओन नॅशनल युनिव्हर्सिटी (Kangwon National University) यांसारख्या नामांकित शैक्षणिक संस्थांबरोबर शिक्षण, रोजगार आणि संशोधनाच्या सहकार्यासाठी सामंजस्य करार केले आहेत.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे आणि अजिंक्य काळभोर यांनी सहभागी मुख्याध्यापक व प्राचार्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
एकंदरीत, भारत आणि कोरिया यांच्यातील शैक्षणिक आणि व्यावसायिक संबंधांना नवी दिशा देण्यासाठी पिंपरी चिंचवड विद्यापीठाने उचललेले हे पाऊल निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या सहकार्यातून दोन्ही देशांतील विद्यार्थी आणि व्यावसायिकांसाठी नवीन संधींची क्षितिजे उघडतील, यात शंका नाही.
