पुणे: जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ लोक शहीद झाले आणि अनेक जण जखमी झाले. या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यासाठी आणि मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पुणे शहरातील पर्वती दर्शन परिसरात रविवारी २७ एप्रिल रोजी मुस्लिम समाजाने निषेध प्रदर्शन आयोजित केले. या वेळी मेणबत्त्या पेटवून शहीदांना आदरांजली वाहण्यात आली.
या निषेध प्रदर्शनाचे नेतृत्व उलेमांनी केले. जमियते उलमाए हिंद पुणे शहराचे अध्यक्ष मौलाना अब्रार अहमद कास्मी आणि शेखुल हदीस मुफ्ती जकरिया यांच्या नेतृत्वाखाली हे प्रदर्शन झाले.
मुफ्ती जकरिया म्हणाले की, जम्मू-कश्मीर हे भारताचे सुंदर हृदय आहे आणि त्याच्या माध्यमातून भारताच्या सौंदर्याला नष्ट करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. मात्र, आम्ही भारतीय एकजुटीने या षड्यंत्राला हाणून पाडू.
मौलाना अब्रार यांनी उपस्थितांना जातीय सलोखा आणि बंधुभाव जपण्याचे आवाहन केले, जे आजच्या परिस्थितीत अत्यंत महत्त्वाचे आहे.
या वेळी ‘दहशतवाद मुर्दाबाद’, ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ आणि ‘भारतीय एकता जिंदाबाद’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
या निषेध प्रदर्शनात मौलाना उमैर बागवान, मौलाना सद्दाम नद्वी, हाफिज जैद, हाफिज सअद यांच्यासह अली भाई, सादिक कुरेशी, सुब्हान कुरेशी, रियाझ सैय्यद, युनुस सैय्यद, मुख्तार पाशा, शब्बीर पटेल, वसीम मुलानी, अझीम शेख, शादुल्ला खान, अनंत कांबळे, कोकाटे, तौसीफ मुलानी, अलाउद्दीन, मोहसिन, अल्लहबक्ष, अलीम नालबंद, नदीम सलीम, सलीम पल्ला, आरिफ मेहबुब, अशफाक इस्माईल, मुस्तफा, युसुफ, संतोष पाटील, युसुफ टायरवाला, समीर अहमद, मुन्ना भाई, अरबाझ, इशरत अंसारी, रशीद शेख यांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले होते.
दहशतवाद्याच्या प्रतिमेला चपलांचा हार घालून त्यावर उपस्थितांनी जोरदार निषेध व्यक्त केला आणि सरकारकडे दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.