Home पिंपरी चिंचवड बापू काटे यांची पिंपरी चिंचवड भाजप अध्यक्षपदी निवड

बापू काटे यांची पिंपरी चिंचवड भाजप अध्यक्षपदी निवड

by maxmanthannews@gmail.com
0 comments

पिंपरी, दि. १३: माजी नगरसेवक शत्रुघ्न उर्फ बापू काटे यांची पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टी (BJP) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज याबाबतची घोषणा केली.

आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता, केंद्र आणि राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपचा शहराध्यक्ष कोण होणार, याकडे विशेष लक्ष लागले होते. भाजप शहर समितीने यासाठी रितसर निवडणूक घेतली होती. काटे यांच्यासोबत माजी सत्ताधारी नेते नामदेव ढाके, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी सरचिटणीस राजू दुर्गे आदी प्रमुख उमेदवार स्पर्धेत होते. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सर्व परिस्थिती आणि ज्येष्ठ नेत्यांचे मत जाणून काटे यांचे नाव जाहीर केले.

बापू काटे यांनी यापूर्वी दोन वेळा नगरसेवक म्हणून काम केले आहे. 2012 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून ते ओबीसी प्रवर्गातून आणि नंतर 2017 मध्ये भारतीय जनता पार्टीकडून महापालिकेत निवडून आले. ते भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. जगताप यांच्या निधनानंतर त्यांचे राजकीय वारस म्हणूनही काटे यांचे नाव चर्चेत होते. जगताप यांच्या काळात शहराचे महापौर किंवा महापालिका स्थायी समिती अध्यक्ष पदासाठीही त्यांचे नाव आघाडीवर होते.

विधानसभा निवडणुकीच्या काळात काटे यांच्यासह 13 माजी नगरसेवकांनी जगताप कुटुंबाच्या बाहेरचा उमेदवार मिळावा यासाठी आग्रह धरला होता. प्रसंगी बंडखोरीचा इशाराही देण्यात आला होता. त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांनी मध्यस्थी केल्यानंतर काटे यांची शहर कार्यकारणीत कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आता त्यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

महापालिकेच्या आगामी निवडणुका जिंकायच्या असल्यास स्थानिक भूमीपुत्रांपैकीच कणखर व्यक्ती शहराध्यक्ष असावी, असा कार्यकर्त्यांचा सूर होता. भाजप निष्ठावानांपैकी अनेकांनी नामदेव ढाके यांच्या बाजूने कौल दिला होता. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असलेल्या या शहरात काटे यांना संधी देण्यामागे ‘तोडीस तोड’ कार्यकर्ता म्हणून संधी देणे हा उद्देश असल्याचे बोलले जात आहे. काटे यांची प्रतिमा सभ्य, सुसंस्कृत, उत्तम संघटक तसेच अभ्यासू कार्यकर्ता अशी आहे. आगामी काळात चिंचवड विधानसभेचे दोन मतदारसंघ झाल्यास, भाजप त्यांच्याकडे संभाव्य उमेदवार म्हणूनही पाहते.

You may also like

Leave a Comment