news
Home पिंपरी चिंचवड मोरवाडी ITI चा बारावी परीक्षेत ९०.७०% निकालाचा धमाका

मोरवाडी ITI चा बारावी परीक्षेत ९०.७०% निकालाचा धमाका

प्रशिक्षणार्थी उच्च शिक्षणासाठी सज्ज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी, दि. १३ मे २०२५ (मॅक्स मंथन डेली न्यूज): नुकत्याच जाहीर झालेल्या बारावी परीक्षेच्या निकालात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोरवाडी येथील ITI प्रशिक्षणार्थ्यांनीही उल्लेखनीय यश संपादन केले आहे. मोरवाडी ITI मधील परीक्षेस बसलेल्या ४३ विद्यार्थ्यांपैकी ३९ विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.

मोरवाडी ITI चे प्राचार्य शशिकांत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशिक्षणार्थ्यांनी परीक्षेत ९०.७०% यश मिळवले असून, ते आता १२वी समकक्षतेचे राज्य मंडळाचे प्रमाणपत्र मिळवून पुढील उच्च शिक्षण घेण्यासाठी सज्ज झाले आहेत.

कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या प्रस्तावानुसार, शालेय शिक्षण विभागाने ITI उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांना १०वी व १२वी ची समकक्षता देण्याबाबत धोरण निश्चित केले आहे. या धोरणानुसार, महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य शशिकांत पाटील यांच्या प्रयत्नांतून संस्थेने राज्य मंडळाचा संस्था संकेतांक मिळवला.

प्रशिक्षणार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरणे, ते राज्य मंडळाच्या कार्यालयात जमा करणे, प्रशिक्षणार्थ्यांना अभ्यासक्रमाची माहिती देणे, यांसारख्या कामांची जबाबदारी संस्थेचे गटनिदेशक प्रकाश घोडके, निदेशक विक्रमसिंह काळोखे आणि विजय चावरिया यांनी सांभाळली.

याव्यतिरिक्त, प्रशिक्षणार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे, त्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षांचे नियोजन करणे आणि त्यांना प्रोत्साहित करणे, यासाठी संस्थेने विशेष प्रयत्न केले. या प्रयत्नांचे फलित म्हणून संस्थेतील विद्यार्थ्यांनी परीक्षेत ९०.७०% यश मिळवले आणि ते आता १२वी समकक्षतेचे प्रमाणपत्र मिळवून उच्च शिक्षणासाठी पात्र ठरले आहेत.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!