पिंपरी (मॅक्स मंथन डेली न्यूज) :- पिंपरी परिसरात महाराष्ट्र विद्युत महावितरण कंपनी लिमिटेडच्या (Mahavitaran) हलगर्जीपणामुळे एका मुक्या जनावराचा मृत्यू झाला. १२ मे २०२५ रोजी रात्री ८.३० ते ९ च्या दरम्यान ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, वळवाच्या पावसामुळे आसरा शोधणाऱ्या जनावराने वैभवनगर फेज १ मधील बी १ बिल्डिंगजवळ असलेल्या महावितरणच्या डी. पी. बॉक्सचा आधार घेतला. तिथे डी. पी. बॉक्समधून विद्युत प्रवाह सुरू असल्याने एका गाईचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन विद्युत पुरवठा खंडित केला आणि मृत गाईला बाजूला केले. मात्र, या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सामाजिक कार्यकर्ते सुहास कुदळे यांनी घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. डी. पी. बॉक्सची पाहणी केल्यानंतर, “केबल शॉर्ट होणे, अर्थिंग नसणे यांसारख्या कारणांमुळे डी. पी. बॉक्समध्ये विद्युत प्रवाह निर्माण झाला असावा,” असा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला.
या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना सुहास कुदळे म्हणाले, “मेंटेनन्ससाठी लाखो रुपयांची टेंडर काढली जातात, तरी पिंपरी परिसरातील डी. पी. बॉक्स सुरक्षित आहेत की नाहीत, याबद्दल मोठी शंका आहे. आज एका मुक्या जनावराचा बळी गेला, उद्या एखाद्या सामान्य नागरिकाचा जीव गेल्यास महावितरण कंपनी जागे होणार का?”

या घटनेला जबाबदार असणाऱ्या अभियंता आणि ठेकेदार यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी कुदळे यांनी केली आहे. यासाठी ते लवकरच येरवडा येथील विद्युत मंडळाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. तसेच, महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता व ठेकेदार यांच्यावर गो (गाई) हत्येचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
घटनेनंतर महावितरणने दाखवलेल्या तत्परतेवरही कुदळे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “जीवंत असताना मदत मिळाली असती, तर कदाचित गाईचा जीव वाचला असता,” असे ते म्हणाले.
कुदळे यांनी पिंपरी विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे काही मागण्या केल्या आहेत. पिंपरी परिसरातील डी. पी. बॉक्सच्या मेंटेनन्ससाठी किती मुदतीआधी व किती कालावधीसाठी ठेकेदाराला काम दिले होते, किती डी. पी. बॉक्सचे मेंटेनन्स केले आहे आणि त्यासाठी अंदाजे किती रुपये खर्च झाले, याची लेखी माहिती त्यांनी मागितली आहे.
