news
Home समाजकारण सेवानिवृत्तीनंतरचे जीवन निरोगी आणि आनंददायी असावे: अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर

सेवानिवृत्तीनंतरचे जीवन निरोगी आणि आनंददायी असावे: अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर

पिंपरी चिंचवड महापालिकेकडून २४ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार!

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

                                                          पिंपरी, दि. ३० एप्रिल, २०२५:

“सेवानिवृत्तीनंतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपले जीवन निरोगी आणि आनंदात व्यतीत करावे. आतापर्यंत नोकरीच्या धावपळीत कुटुंबाला पुरेसा वेळ देता आला नसेल, तर आता तो द्यावा. तसेच, नोकरीदरम्यान राहून गेलेले पर्यटन आणि आपले आवडते छंद जोपासण्याची ही योग्य वेळ आहे,” असे विचार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी व्यक्त केले. त्यांनी आज सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पुढील आनंदी आणि आरोग्यदायी जीवनासाठी शुभेच्छाही दिल्या.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात एप्रिल २०२५ अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणारे १४ आणि स्वेच्छानिवृत्ती घेतलेले १० अशा एकूण २४ कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला, त्यावेळी त्या मार्गदर्शन करत होत्या.

या कार्यक्रमाला मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, लेखाधिकारी चारूशिला जोशी, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, लघुलेखक सुनीता पळसकर, सुनीता कामथे, उप लेखापाल माया गीते, नयना दिक्षित, मुख्य लिपिक माया वाकडे, अनिता चेमटे, कर्मचारी महासंघाच्या उपाध्यक्षा सुप्रिया सुरगुडे तसेच कर्मचारी महासंघाचे उमेश बांदल, बालाजी अय्यंगार, नंदकुमार इंदलकर आणि महापालिकेचे अनेक कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

माहे एप्रिल २०२५ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये प्रशासन अधिकारी श्रद्धा बोरडे, मुख्याध्यापक सुनंदा मगर, वैद्यकीय समाजसेवा अधिक्षक सुजाता भोसले, लेखापाल मधुकर सानप, सिस्टर इनचार्ज अनिता आगवणे, उपशिक्षक संजिवनी राऊत, स्टाफ नर्स माधुरी यादव, रखवालदार अनिल घाडगे, शिपाई रफिक सुतार, मजूर गोवर्धन दखनेजा, सुनील काळे, किरण जगदाळे, सफाई कामगार मंदा जाधव आणि सफाई सेवक शांताराम मेंगळे यांचा समावेश आहे.

तर स्वेच्छानिवृत्ती स्वीकारलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये स्टाफ नर्स मिनाक्षी आढाव, सफाई कामगार पारूबाई काळोखे, मिना जाधव, चंद्रकांत जगताप, संगिता कांबळे, सफाई सेवक लख्खन पुनमचंद, जयप्रकाश जाधव, तानाजी सनके, गटरकुली जंगल गोठे आणि सफाई कामगार दत्तात्रय हाटकर यांचा समावेश आहे.

कार्यक्रमाची सुरुवात प्रमोद जगताप यांच्या प्रास्ताविकाने झाली, तर सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले. वातावरणात निरोप घेणाऱ्या कर्मचाऱ्यांबद्दल आदर आणि पुढील वाटचालीस शुभेच्छांचा भाव स्पष्टपणे दिसत होता.\

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!