पिंपरी (मॅक्स मंथन डेली न्यूज): जाधववाडीतील तब्बल १७५ एकर जमिनीवर महाआरक्षण टाकल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. यापूर्वी कुदळवाडीतील नागरिकांनी अतिक्रमण कारवाईचा फटका सोसला असतानाच, आता जाधववाडीतील नागरिकांवर विकास आराखड्याचे (डीपी) संकट ओढवले आहे.
१६ मे रोजी जाहीर झालेल्या नवीन शहर विकास आराखड्यात (डीपी), संपूर्ण जाधववाडी, रोकडे वस्ती आणि रिव्हर रेसिडन्सीपर्यंतच्या १७५ एकर म्हणजेच ७ लाख १० हजार ९०० चौरस मीटर क्षेत्रावर ‘सुपर एडमिनिस्ट्रेटीव्ह कम कमर्शियल कॉम्प्लेक्स’ (एसएसीसीसी) अर्थात भव्य प्रशासकीय व व्यापार संकुलाचे महाआरक्षण टाकण्यात आले आहे. निवासी आरक्षणाच्या जागेवर शासकीय कार्यालय आणि व्यापार संकुलासाठी आरक्षण टाकल्याने गावकरी संतप्त झाले आहेत.

जाधववाडीच्या बैठकीत संतापाचा उद्रेक:
विकास आराखड्यात जाधववाडीतील सर्व जमीन महाआरक्षणात टाकल्याने येथील भूमिपुत्रांनी एकत्र येत तीव्र नाराजी व्यक्त केली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर राहुल जाधव यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली पाचशेहून अधिक ग्रामस्थ संत सावता माळी जाधववाडी मंदिरात तातडीने आयोजित केलेल्या बैठकीत सहभागी झाले. या बैठकीत नवीन डीपी प्लॅनला तीव्र विरोध नोंदवण्यात आला.
यावेळी माजी महापौर राहुल जाधव यांच्यासह संतोषतात्या जाधव, जितूभाऊ यादव, विशालभाऊ आहेर, एडवोकेट विशाल जाधव, विकास साने, सामाजिक कार्यकर्ते विशाल बालघरे, उदयसिंह पाटील, तानाजी जाधव, सोमनाथ जाधव, संजय जाधव, प्रदीप आहेर,रविशेठ जाधव युवा नेते स्वप्निल भाऊ रोकड सुरज भाऊ जाधव, उद्योजक बळीराम माने,माजी नगरसेवक माऊली भाऊ जाधव,कपिल रोकडे, हरिनामा रोकडे, संभाजी तात्या यादव,कपिल रोकडे, हरिनामा रोकडे, संभाजी तात्या यादव,चंदन सिंग राजपूत,विलास शेठ जाधव उद्योजक,हनुमंत तात्या जाधव,गणेश धायरकार, आदी मान्यवरांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले आणि त्यांच्या संघर्षात सहभागी असल्याची ग्वाही दिली.
राहुल जाधव यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आम्ही एक इंचही जमीन देणार नाही. जोवर हे आरक्षण निघत नाही, तोवर आमचा लढा सुरूच राहील. जुन्या डीपीतील आरक्षणे अजून विकसित झालेली नाहीत, त्यात आता हे मोठे आरक्षण टाकून आम्हाला भूमिहीन करण्याचा डाव आहे. यापूर्वी टेल्को, रेडझोन, एमआयडीसी, प्राधिकरणात आमच्या जमिनी गेल्या आहेत. आता पुन्हा १०० टक्के स्थानिक शेतकऱ्यांचा या आरक्षणाला विरोध आहे. गाव जी भूमिका घेईल, तिच्यासोबत आम्ही आहोत.”

ग्रामस्थांनीही आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, त्यांच्याकडे थोडीच जमीन शिल्लक आहे. या आरक्षणाचा नेमका हेतू काय आहे, त्याचे कारण काय आणि मोबदला काय मिळणार, याबद्दल त्यांना कोणतीही माहिती नाही. त्यांचे निवासी क्षेत्र निवासीच राहू द्यावे, ते स्वतः त्याचा विकास करतील, असे त्यांनी ठणकावून सांगितले. आता गावकरी पूर्वीसारखे अज्ञानी नाहीत, त्यांच्यात अनेक शिकलेले लोक, बिल्डर आणि आर्किटेक्ट आहेत, त्यामुळे ते आपल्या हक्कांसाठी लढण्यास सज्ज आहेत.
आता या महाआरक्षणाला ग्रामस्थ कशा प्रकारे विरोध करतात आणि महानगरपालिका प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
