news
Home पिंपरी चिंचवड कुदळवाडीतील धार्मिक स्थळांवरील कारवाईला तात्पुरती स्थगिती! प्रशासनाकडून कायदेशीर प्रक्रियेचे आश्वासन!

कुदळवाडीतील धार्मिक स्थळांवरील कारवाईला तात्पुरती स्थगिती! प्रशासनाकडून कायदेशीर प्रक्रियेचे आश्वासन!

उपमुख्यमंत्री, ॲड. असीम सरोदे आणि पीसीएमसी शहर अभियंत्यांच्या बैठकीनंतर तोडगा; कायदेशीर प्रक्रियेचे पालन करण्याचे आश्वासन!

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड (मॅक्स मंथन डेली न्यूज): पिंपरी-चिंचवड शहरातील धार्मिक स्थळांवरील कारवाईच्या मुद्द्यावरून मागील काही दिवसांपासून तणावाचे वातावरण होते. मात्र, आता या संदर्भात सकारात्मक घडामोडी समोर येत आहेत.

चिखली-कुदळवाडी येथील धार्मिक स्थळांना ‘अतिक्रमण’ ठरवून नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. या नोटिसा एकतर्फी असून कायद्याची योग्य प्रक्रिया न पाळता काढण्यात आल्याचा युक्तिवाद ॲड. असीम सरोदे यांनी केला होता. यावर पीसीएमसीचे शहर अभियंता मकरंद निकम यांनी महत्त्वपूर्ण ग्वाही दिली आहे की, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) कुदळवाडीमधील मंदिर आणि मस्जिदींना हात लावणार नाही. यामुळे डिमॉलिशनच्या कारवाईला तात्पुरती स्थगिती मिळाली आहे.

ॲड. असीम सरोदे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह पीसीएमसी कार्यालयात शहर अभियंता मकरंद निकम यांची भेट घेऊन चर्चा केली. या वेळी कायद्याच्या अभ्यासक वकिलांचा समावेश होता. ॲड. श्रीया आवले यांनी सांगितले की, महानगरपालिका कायद्याच्या कलम ४८७ नुसार पीसीएमसीला नोटीस देणे आवश्यक आहे आणि ती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. शहर अभियंता निकम यांनी ॲड. सरोदे यांना आश्वस्त केले की, सुनावणी घेतल्याशिवाय आणि सर्वांचे मत विचारात घेतल्याशिवाय कोणतीही कारवाई होणार नाही.

या पार्श्वभूमीवर, धार्मिक स्थळे पाडण्यावर साधारणतः २५ ते ३० दिवसांचा ‘स्टे’ मिळाल्याचे ॲड. असीम सरोदे यांनी स्पष्ट केले. ॲड. गौतम कुडूक यांनी माहिती दिली की, आता सर्व मंदिर आणि मस्जिद अशा धार्मिक स्थळांची पाहणी केली जाईल, त्याबाबत अहवाल तयार केला जाईल, संबंधितांना सुनावणीसाठी वेळ दिला जाईल आणि त्यानंतर पुढील १५ दिवस न्यायालयात जाण्यासाठी वेळ मिळेल. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या या प्रक्रियेचे पालन केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, या विषयावर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्यासमवेत एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत विधानसभा उपाध्यक्ष श्री. अण्णा बनसोडे, नगरविकास विभागाच्या राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, विभागीय आयुक्त श्री. दीपक पुंडलकर, जिल्हाधिकारी जितेंद्र दुड्डी आणि मनपा आयुक्त शेखरसिंग उपस्थित होते. या बैठकीत आंदोलकांनी आपली भूमिका सविस्तरपणे मांडली आणि त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात आला. या बैठकीत राहुल डंबाळे, उद्योजक हबीब शेख, फजल शेख, शाहाबुद्दीन शेख, हाजी युसुफ कुरेशी, हाजी नियाज अहमद सिद्दिकी, सय्यद हाजी गुलाम रसूल आणि मस्जिद और मदरसा अँक्शन कमिटी कुळवाडी चिखली पिंपरी चिंचवड शहरचे पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री यांच्यासोबत झालेल्या बैठकीतील सकारात्मक प्रतिसाद आणि शहर अभियंत्यांनी दिलेली ग्वाही यामुळे कुदळवाडीतील धार्मिक स्थळांवरील कारवाईचा धोका काही काळासाठी टळला आहे. आता प्रशासन यावर कोणती अधिकृत भूमिका घेते, याकडे लक्ष लागलेले आहे.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!