news
Home पिंपरी चिंचवड श्रीरंग बारणे यांना ‘संसदीय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान’ पुरस्कार!

श्रीरंग बारणे यांना ‘संसदीय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान’ पुरस्कार!

उत्कृष्ट संसदीय कामगिरी आणि जनसेवेचा गौरव; मावळच्या जनतेला पुरस्कार अर्पण!

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी (मॅक्स मंथन डेली न्यूज): मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना त्यांच्या उत्कृष्ट संसदीय कामगिरीसाठी ‘संसदीय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान’ पुरस्कार जाहीर झाला आहे. बारणे यांना यापूर्वी दोन वेळा ‘संसदरत्न’ आणि एकदा ‘महासंसदरत्न’ व ‘संसद विशिष्टरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

खासदार बारणे यांची लोकसभेतील प्रभावी उपस्थिती, जनहिताचे प्रश्न, चर्चेतील सहभाग, खासगी विधेयक आणि अनुकरणीय सर्वोत्तम कामगिरी यासाठी हा पुरस्कार दिला जातो. प्राईम पॉईंट फौंडेशनतर्फे दिला जाणारा हा पुरस्कार माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आला आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने बारणे यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे.

चालू १८ व्या लोकसभेत खासदार बारणे यांनी १३८ प्रश्न विचारले आहेत, ३५ चर्चेत सहभाग घेतला आहे आणि ३ खासगी विधेयके मांडली आहेत. त्यांची सभागृहातील उपस्थिती ९६ टक्के आहे. त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना ‘संसदीय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

खासदार बारणे यांनी केवळ संसदेत आवाज उठवला नाही, तर प्रत्यक्षात जमिनीवरही काम केले आहे. मावळमधील आदिवासी पाडे, वाड्या वस्त्यांवर वीज आणि रस्त्यांची सुविधा निर्माण केली. गावा-गावांमधील अंतर्गत रस्ते आणि पाण्याची सुविधा सक्षम केली. त्यांनी स्वखर्चाने पवना धरणातील गाळ काढून पिंपरी-चिंचवडकरांच्या पाण्याची सोय केली. पिंपरीत पासपोर्ट कार्यालय सुरू केले. क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या नावाने टपाल तिकीटाचे प्रकाशन केले. एच.ए. कंपनीला आर्थिक मदत मिळवून दिली. पवना आणि इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला गती दिली. रेल्वेचे जाळे विस्तारले जात आहे. पनवेलला लोकल सुरू झाली. अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेअंतर्गत रेल्वे स्थानकांचा कायापालट केला जात आहे. लोणावळा ते पुणे दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकच्या कामाचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.

दोन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातील जनतेने सलग तीन वेळा माझ्यावर विश्वास टाकला, असे खासदार बारणे यांनी सांगितले. हा पुरस्कार मावळच्या जनतेला अर्पण करत असल्याचे त्यांनी नमूद केले. “मावळवासीयांनी केलेल्या सहकार्यामुळेच मी हे काम करू शकलो,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!